पुणे जिल्हा: दयोदय गोशाळा येथे स्केटिंग ट्रॅकचा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती – बारामती येथील शहा कुटुंबियांनी अतिशय मेहनतीने व सचोटीने काम करून ज्वेलरी क्षेत्रात संपुर्ण महाराष्ट्रात नावलौकीक संपादन केले आहे. शहा कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनंतर आता आपल्या पारंपारिक व्यवसायाबरोबरच शेतीमध्ये काम करण्यासाठी चौथी पिढीही प्रवृत्त झाली आहे. याचे खरोखरच कौतुक आहे.
बारामती- मळद येथे सुरू केलेल्या दयोदय गोशाळा व त्यासोबतच सुरू केलेल्या स्केटिंग, हॉर्सरायडिंग, इनडोअर क्रिकेट व अन्य खेळ तसेच गोमुत्राचा उपयोग करून खर्या अर्थाने सेंद्रीय खत असणार्या गोष्टींची निर्मिती येथे होत आहे. या सर्व उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देत अभिनंदन करतो आणि असे रास्त काम माझ्या मतदार संघात होत असल्याबद्दल लोकप्रतिनीधी म्हणून याचा मला अभिमान आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढले.
दयोदय गोशाळा येथे उभारण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकच्या शुभारंभ प्रसंगी अजितदादा पवार बोलत होते. दयोदय गोशाळेमध्ये देशी गाईंच्या गोमूत्र व शेणापासून निर्मिती केलेल्या स्वर्णामृत या सेंद्रीय खताचा वापर करून शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकता. यामध्ये आपली पूर्वीची परंपरा जतन करणे हा मुळ उद्देश आहे. यालाच जोड म्हणून स्केटिंग, हॉर्सरायडिंग सारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या भागाचा नावलौकीक वाढला जाणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या सर्व उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो.
यावेळी श्री. अतुलकुमार जिनदत्त शहा, सौ. संगिता अतुलकुमार शहा, श्री. सिध्दार्थ अतुलकुमार शहा व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मा. ना. अजितदादा पवार म्हणाले की, दयोदय गोशाळा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून देशी गाईंचे संरक्षण करत बेवारस जनावरांची येथे योग्य प्रकारे निगा राखली जाते. यावेळी दयोदय गोशाळेतर्फे श्री. अतुलकुमार शहा व श्री. सिध्दार्थ शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला.





