पुणे जिल्हा : कार्तिकीनिमित्त श्रींची पालखी प्रदक्षिणा उत्साहात

आळंदीत 50 हजार भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन
आळंदी – कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आळंदीत दाखल झाले होते. जवळपास 50 हजार भाविकांनी श्रींचे समाधी दर्शन तर हजारो भाविकांनी नगरप्रदक्षिणा केली.
एकादशीनिमित्त माऊली मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी साडेपाच वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री 12 वाजेपर्यंत ते भाविकांसाठी खुले होते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रिघ होती.
एकादशीनिमित्त भाविकांना मंदिरात 300 किलो खिचडी फराळ वाटप करण्यात आला. सायंकाळी साडेपाच ते साडेसात यावेळेत श्रींची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा पार पडली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते.
रात्री 12 ते 4 मोझे यांच्या वतीने मंदिरात हरिजागराचा कार्यक्रम झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त माऊली मंदिर, इंद्रायणी घाट परिसरासह पंचक्रोशीत भक्तीमय वातावरण होते.





