पुणे जिल्हा : श्री दत्तकृपा पतसंस्थेस ४१ लाख रुपयांचा नफा

मंचर : मंचर (ता. आंबेगाव) येथील श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेस ४१ लाख ७० हजार ५४३ रुपये एवढा नफा झाला आहे. सभासदांना ११ टक्के लाभांश संचालक मंडळाने जाहीर केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी निघोट यांनी दिली.
श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सभा शरद पवार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बापुराव निघोट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेकडे २१ कोटी ९४ लाख ९९ हजार १९५ रुपयांच्या ठेवी असून १६ कोटी ७७ लाख ५९ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
संस्थेस ४१ लाख ७० हजार ५४३ रुपये नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश संचालक मंडळाने जाहीर केला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, संस्थापक / संचालक बबन ज्ञानेश्वर मोरडे, संचालक – संजय मोरे, लक्ष्मण बाणखेले, मगन कराळे, संतोष कसाब, स्वाती इंदोरे, सुलोचना वाळुंज उपस्थित होते.
संख्येचे जेष्ठ सभासद भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे व बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गवळी यांनी अहवाल वाचन केले. संचालक संतोष कसाब यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय दत्तात्रय मोरे यांनी आभार मानले. वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.





