पुणे जिल्हा : सोपानकाकांच्या पालखीवर पुष्पवृष्टी

वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधी मंदिरात विसावली
वाल्हे – महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्हेनगरीत श्री संत सोपानकाका पंचक्रोशी प्रदक्षिणासाठी निघालेल्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार (दि.27) सकाळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पुष्पवृष्टी करीत, आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधी मंदिरात विसावली.
गुरूवार (दि.26) रोजी संत सोपानदेव समाधी मंदिर सासवड येथून निघालेला श्री संत सोपान देव पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा पहिल्या दिवशीचा दौंडज येथील मुक्काम आटोपून शुक्रवार सकाळी वाल्मिकनगरीत दाखल झाला.
हभप श्री माऊली (छोटे माऊली) महाराज कदम आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला सोहळा दहा दिवस चालणार आहे. सोहळ्यात ह.भ.प. मंगेश महाराज कदम, सुधाकर गिरमे, दिलीप गायकवाड यांच्या सहकार्यातून 200 वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
वाल्हेनगरीत सोहळ्याचे स्वागत नवनिर्वाचित सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच अमोल खवले, माणिक महाराज पवार, अशोक महाराज पवार, बबन महाराज भुजबळ, विनायक पवार, राजेंद्र लंबाते, मोहन पवार, जयराम पवार आदींनी केले. वाल्हेकरांची सकाळची न्याहरी घेऊन दुपारचा विसावा परिंचे येथे करून पंचक्रोशी प्रदक्षिणा पालखी सोहळा भोंगवली येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.





