पुणे जिल्हा : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी दुकानं सज्ज

बाजारात विविध आकर्षक सजावटीचे समान उपलब्ध
लोणी देवकर –अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे आकर्षक सजावटीचे साहित्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले आहे. सजावटीच्या साहित्याने ग्रामीण भागातील बाजारपेठा फुलल्या आहेत. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तसेच अवघ्या काही दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन येऊन ठेपल्याने नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
शनिवारी (दि. 7) गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे आगमन होत आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती बाप्पा साठी नागरिकांची सध्या सजावटीच्या साहित्यांची खरेदीसाठी रेलचेल सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यामध्ये प्रामुख्याने नागरिक पर्यावरणपूरक सजावटी साठी आग्रही असल्याचे येथील व्यावसायिक विजय डोंगरे यांनी सांगितले. सजावटीच्या साहित्यांमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारची विद्युत रोषणाई ची उपकरणं, कापड आणि कागदापासून तयार केलेल्या वस्तू तसेच माती च्या देखील विविध सजावटीच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनासाठी सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी बाजरपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.





