पुणे जिल्हा : बारामतीच्या शिवजल ग्रुपचा दिल्लीत गौरव

बिजनेस एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित
माळेगाव : बारामती येथील शिवजल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यरत असलेल्या शिवजल ग्रुपला दिल्ली येथे बिझनेस एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवार (दि.२४) रोजी दिल्ली येथील पंचतारांकित ताज ॲमेसिडरमध्ये हा सोहळा झाला. देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार शिवजल ग्रुपच्या सदस्यांना देण्यात आला.
शिवजल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले, चेअरमन नितीन जाधव, व्हाईस चेअरमन राहुल देशमुख, उपाध्यक्ष रितेश सावंत, संचालक उत्तम नाळे, सीईओ पांडुरंग सोनवणे, संचालक प्रकाश चव्हाण यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
शिवजल ग्रुपच्या वतीने आटपाडीतील जग्वार सिटी, गोविंद पार्क, बारामती कटफळ येथील ५१ एकरांतील जग्वार सिटी तसेच नीरा येथील जग्वार सिटी मॉल या प्रोजेक्टस्ने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली आहेत. एक कोटी झाडे, पाच लाख घरे आणि एक हजार उद्योजक तयार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्यरत राहणाऱ्या शिवजल ग्रुपला हा पुरस्कार रेडिओ ऑरेंजकडून देण्यात आला.
यावेळी नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातून आपण केलेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे. तसेच आपण ग्रामीण भागातच उत्तम पद्धतीने कार्य करून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सोयी- सुविधा उपलब्ध करून देत आहात. ग्रामीण भागातच आपण कार्यरत रहा, असा सल्ला मंत्री गडकरी यांनी दिला.
आणखी मेहनतीची प्रेरणा
पुरस्कार मिळाल्यानंतर शिवजलचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले म्हणाले की, रेडिओ ऑरेंजकडून दिलेल्या पुरस्कारामुळे आमचे पाठबळ वाढले आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी मेहनतीची प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया यांनी दिली.





