सुवर्णमहोत्सवी सर्वसाधारण सभेत अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती अकलूज – शंकरनगर-अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 50 मे.टन क्षमतेच्या कंडेन्स मिल्क प्लांटला सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. खासगी स्पर्धेत टिकण्यासाठी पावडर प्लांट उभारणे आवश्यक असल्याचे संघाचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. विजयनगर-अकलूज येथील रत्नाई सभागृहात ही सभा उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अहवाल वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा आणि पशुखाद्य खरेदी करणार्या मानेवस्ती कोंडबावी दूध संकलन केंद्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळाला. या केंद्राला 51 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार केंद्राचे चेअरमन पांडुरंग माने व सचिव युवराज वाघमारे यांनी स्वीकारला. सभेत एकूण 18 संस्थांचा दूध व पशुखाद्य पुरवठा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, कोविडनंतर दुग्ध व्यवसायात मोठी घसरण झाली, परंतु शेतकरी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे आज संघ पुन्हा सक्षम स्थितीत आला आहे. राज्य व केंद्र सरकार दुग्ध व्यवसायाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत याबाबत बैठक झाली असून शिवामृत दूध संघ सुवर्णमहोत्सवी वर्षात आधुनिक पावडर प्लांट उभारेल. या सभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्यासह संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक हरिभाऊ मगर यांनी मानले.