Pune District : शिरूरकरांचे आरोग्य धोक्यात

शिरूर : शहरातून वाहणार्या घोडनदीच्या संपूर्ण काठावर माजलेल्या जलपर्णी आणि विषारी वणस्पती… झाडाझुडपांना केरकचरा व घाण अडकून सुटलेली दूर्गंधी… नदीपात्रात आणून टाकलेला राडारोडा आणि काही ठिकाणी तर चक्क पूररेषा ओलांडून नदीपात्रात झालेली बांधकामे… फाटके कपडे, चिंध्या, केरकचरा, केसांचे पुंजके आणि प्लॅस्टिकच्या कचर्याने गच्च भरलेला किनारा… काही ठिकाणी मेलेल्या माशांचा खच, इतस्ततः विखूरलेले कोंबड्यांचे पंख व वेस्टेज आणि एका ठिकाणी चक्क नदीपात्रात मेलेले कुत्रे… शिरूर शहर आणि परिसरातून वाहणार्या घोडनदीच्या किनार्यावरून सहज फेरफटका मारला तरी तब्बल पाच मोठे आणि सुमारे 25 छोटे सांडपाण्याचे ओहोळ थेट घोडनदी पात्रात मिसळत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
शिरूर शहराला पाणीपुरवठा करणार्या योजनेचा उद्भव असलेल्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यात तर याहून वाईट स्थिती असून बंधार्याच्या लोखंडी ढाप्यांना मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, कागदाचा कचरा, देवदेवतांचे जीर्ण फोटो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या भग्न मूर्ती, चिंध्या अडकून पडल्या आहेत तर मोठ्या प्रमाणात जलपर्णींचा विळखा देखील बसला आहे. सुमारे एक लाख लोकसंख्येच्या शिरूर शहराला घोडनदीवरून राबविलेल्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याजवळील पंपिंग स्टेशनवरून जलशुद्धीकरण केंद्रावर नेलेले पाणी शहरवासियांना टप्प्याटप्प्याने वितरित केले जाते. या बंधार्यात डिंभे धरणातून किंवा डिंभे उजव्या कालव्याच्या वितरिकेतून पाणी सोडले जाते. तब्बल 27 बंधारे भरल्यानंतर हे पाणी शिरूर शहराच्या बंधार्यात येते.
बंधार्याच्या पुढील बाजूस नदीपात्राची अवस्था आणखी भयानक आहे. अमरधाम स्मशानभूमी, शहराचा दशक्रिया विधी घाट, गाई गुरांचा सांभाळ करणारे पांजरपोळ नदीकिनारी असून, 17 कमानीचा पूल ते बंधारा या अडीच-तीन किलोमीटरच्या परिसरात नदीपात्र संपूर्णपणे दूषित झाले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर दहनातून उरलेली राख, काही प्रमाणात मृतांच्या अस्थी नदीपात्रात टाकल्या जातात. मृत किंवा रुग्णाच्या अंगावरील कपडे, त्यांची अंथरुण-पांघरूण देखील अनेकदा नदीपात्रात फेकून दिले जातात. दशक्रिया विधी घाटावर नदीकिनारी मुंडण करून केस व मुंडण करण्यासाठी वापरलेले ब्लेड, कपडे नदीपात्रात फेकले जातात.
याच ठिकाणी कोंबड्यांचे पंख व वेस्टेजही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पडलेले दिसते. फाटके कपडे, चिंध्या, सडलेली फळे व पालेभाज्या आणि केरकचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो. त्यामुळे दशक्रिया विधी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दूर्गंधी पसरलेली असते. गोरक्षण पांजरपोळ मधील मेलेली जनावरेही काही वेळा नदीकिनारीच टाकून दिली जातात. बंधार्याच्या अलिकडील भागात नदीकिनारी मोठ्या प्रमाणात जुन्या पाडलेल्या बांधकामाचा राडारोडा टाकून दिलेला असून, काही ठिकाणी नदीकिनारी दारूच्या बाटल्यांचा खचदेखील पडल्याचे चित्र आहे.
चौकट : या ठिकाणाहून मिसळते नदीपात्रात सांडपाणी…
मोतीनाला हा सर्वात मोठा ओढा शिरूर शहराजवळ घोडनदीला मिळत असून त्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात जात आहे. रांजणगाव एमआयडीसीतील काही कंपन्या घातक रसायन व दूषित पाणी याच ओढ्यात सोडत असून सरदवाडी, कारेगाव, महाजन मळा येथील सांडपाणी देखील याच ओढ्यात सोडले जाते व हा ओढा घोडनदीतील बंधार्याजवळ मिळत असल्याने मोठ्या प्रमाणातील सांडपाण्यामुळे तेथे नदीपात्रातील पाण्याचा रंग देखील काळसर दिसून येतो. काही केमिकल कंपन्यांतील सांडपाणी रात्रीच्या वेळी टँकरमधून थेट नदीपात्रात आणून टाकले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. याशिवाय शहरातील प्रोफेसर कॉलनी, ढोर आळी, कैकाड आळी, काची आळी, कुंभार आळी, दशक्रिया विधी घाट, वीटभट्ट्या या परिसरातून मैलापाणी व सांडपाण्यांचे सतत वाहणारे ओहोळ नदीपात्रात मिसळताना दिसतात.
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सांडपाण्याचे प्रमाण अधिक असून त्यावर प्रक्रिया केली जाते. तरीही अतिरिक्त एचटीपी प्लँटबाबत डीपीआर तयार केला असून शासन मान्यतेसाठी पाठविला आहे. साडेतीन कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पानंतर मैलापाणी व सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करता येईल.
– प्रीतम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद
शहरात मोतीनाला व खारामळा या दोन ठिकाणी सांडपाणी व मैलापाणी पंपिंग करून ते शनिमंदिराजवळील सिवेज ट्रीटमेंट प्लँटमध्ये नेले जाते व तेथे त्यावर प्रक्रिया करून हे पाणी घोडनदीपात्रात सोडले जाते किंवा नदीकिनारी केलेल्या वनराईला दिले जाते. शेजारील ग्रामपंचायतींकडून व इतर छोट्या गावातील सांडपाणी नदीपात्रात मिसळले जात असावे. त्याबाबत पाहणी करून नगर परिषदेमार्फत नोटीसा बजावल्या जातील.
– आदित्य बनकर, अभियंता,पाणीपुरवठा व स्वच्छता, विभाग, शिरूर नगरपरिषद
दूषित पाण्यामुळे टायफॉईड, अतिसार, नारू हे आजार बळावत असून पाण्यातील रासायनिक घटकांमुळे यकृत, मूत्रपींड व मेंदूवर परिणामाची शक्यता असते. पाण्यातून सातत्याने रासायनिक घटक शरीरात गेल्यास व दीर्घ काळ संपर्क आल्यास कर्करोगासारख्या असाध्य व्याधीही जडू शकतात. घोडनदीचे पाणी पिण्यास लायक नसल्याचे अनेक चाचण्यांतून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. नगमोपरिषद जलशुद्धीकरणासाठी काही प्रयत्न करीत असेल, पण ते तोकडे आहेत. म्हणून शक्यतो पाणी उकळून प्यावे.
– डॉ. विक्रम घावटे, बालरोगज्ज्ञ, शिरूर





