पुणे जिल्हा : शिरूर तहसील कार्यालय आता ग्रीन बिल्डिंग

तहसीलदार बाळासाहेब मस्के यांची माहिती
शिरूर – शिरूर तहसील कार्यालय आता पर्यावरणपूरक इमारत म्हणजेच ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून विकसित होणार आहे. सौरऊर्जेच्या वापरातून संपूर्ण कार्यालयाचा वीजपुरवठा होणार असून या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे टेंडर मंजूर झाले आहे. ही माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नायब तहसीलदार विनायक कौलकर आणि तालुका पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने हे देखील उपस्थित होते. तहसीलदार मस्के म्हणाले की, नवीन सौरऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेनंतर शिरूर तहसील कार्यालय 100 टक्के सौरऊर्जेवर चालणारे होणार आहे. या प्रकल्पामुळे ऊर्जा बचतीसोबतच पर्यावरणावर होणारा भारही कमी होणार आहे.
ही एक महत्त्वाची पायरी ‘हरित प्रशासन’ या उद्दिष्टाच्या दिशेने आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्यात आल्या आहेत. इमारतीची स्वच्छता, रंगकाम, विद्युत सुधारणा, नवीन फर्निचरची व्यवस्था आणि परिसराचे सुशोभीकरण यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे मागविण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील पायाभूत सुविधांमध्येही लक्षणीय प्रगती झाली आहे. आतापर्यंत 41 पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून, 171 वहिवाटीच्या रस्त्यांच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः वडगाव रासाई गावातील 2010 पासून प्रलंबित असलेला रस्ता प्रश्नही यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला आहे.
दाखले वाटपात विक्रमी कामगिरी
गेल्या दोन वर्षांत शिरूर तहसील कार्यालयातून उत्पन्न, अधिवास (डोमिसाईल), जातीचे दाखले इत्यादी मिळून एकूण 87 हजार दाखले वितरित करण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळत आहे, असे तहसीलदार मस्के म्हणाले.





