पुणे जिल्हा : शिक्रापूरचा मुन्नाभाई अखेर अटकेत ;दोन वर्षांपूर्वी बोगस कोविड केअर सेंटर चालविले

माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षांपूर्वी आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल उभारले. दरम्यान, त्याच्यावर बोगस हॉस्पिटलबाबत गुन्हे दाखल होताच एका स्थानिक माजी सरपंचावर खंडणीचे आरोप करीत गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर कोविड काळात कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारल्याने गुन्हे दाखल झाले असताना आता मुन्नाभाईने बारामती तालुक्यात हॉस्पिटल सुरु करुन एका नर्सला प्रेमात अडकवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्रापूरच्या त्याच मुन्नाभाईवर माळेगाव पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (सध्या रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, मूळ रा. शेलू बुद्रुक, जि. यवतमाळ), असे गुन्हे दाखल केलेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. शिक्रापूर येथे बोगस हॉस्पिटल चालवल्याप्रकरणी डॉ. रामेश्वर बंडगर याच्याविरुद्ध दोनवेळा गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. हे गुन्हे दाखल झाले असताना डॉ. बंडगर याने दोनवेळा वेगवेगळे पत्ते दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. गुन्हे दाखल झाले असताना मुन्नाभाईचे कारनामे सुरूच होते.
सध्या शिक्रापूर येथील हॉस्पिटल बंद असून डॉ. बंडगर हा बारामती तालुक्यातील माळेगाव येथील रामकृष्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्याने या हॉस्पिटलमधील एका 19 वर्षीय नर्स म्हणून काम करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वतःचे लग्न झालेले असल्याचे लपवून युवतीशी जवळीक करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिच्या पालकांशी चर्चा करीत विवाहाची तयारी केली. दरम्यान, युवतीशी जवळीक करीत शारीरिक सुखाची देखील मागणी करु लागला. मात्र, युवतीच्या काही नातेवाइकांना डॉ. बंडगर याचा यापूर्वी विवाह झाला असून तो बोगस डॉक्टर असल्याबाबत गुन्हे दाखल झाल्याचे पुरावे मिळाल्याने या मुन्नाभाईचा भांडाफोड झाला. याबाबत पीडित युवतीने माळेगाव पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी डॉ. बंडगर याला अटक केली आहे.
कसून तपास करणार- इंगळे
डॉ. बंडगर याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच त्याला अटक केली आहे. हॉस्पिटल त्याचे स्वतःचे की अन्य कोणाचे यासह युवतीशी त्याने कोर्ट विवाहाबाबत पूर्तता केलेली असताना त्यात पुढे काय झाले याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.





