Pune District : बागायती भागातून मेंढपाळ परतीच्या मार्गावर

चांगला पाऊस झाल्याने गावी परत
लोणी भापकर – बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत भागात मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्यात पडलेल्या चांगल्या पावसामुळे या परिसरात शेळ्या मेंढ्यांसाठी चांगले गवत उगवून चारा होऊ लागला आहे. उन्हाळ्यात परिसरात बकऱ्यांना चराईस चारा नसल्यामुळे बाहेरगावी गेलेले मेंढपाळ आपल्या हजारो मेंढ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे आता गावाकडे परतू लागले आहेत.
लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, माळवाडी, का-हाटी, खामगळवाडी, कानाडवाडी, मुर्टी-मोढवे आदी मार्गावर मेंढ्यांचे कळप रस्त्याच्या बाजूने चालताना दिसून येत आहेत. या भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय करीत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आत्ता हा व्यवसाय कमी होऊ लागल्याचे दिसत आहे.
उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा काळात दरवर्षी मेंढपाळ चाऱ्याच्या शोधात कोकण, मावळ, नाशिक, नगर तसेच बागायती भागामध्ये जातात. त्याठिकाणी माळरान, गावठाण चराईसाठी पीक मेंढपाळ करार करून ठरलेल्या रकमेवर दरवर्षी जात असतात. त्या जंगलातील पिकांची काढणी होताच मोकळ्या क्षेत्रात मेंढ्या चारतात.
नाल्या खो-यातील चराईवर जून महिना येईपर्यंत मेंढ्या राहतात. त्याबदल्यात त्याच शिवारात एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात ठरावीक रकमेवर मेंढ्या बसवून मिळणाऱ्या एकूण रकमेतून पीक संस्थेत ठरलेली रक्कम अदा करतात.





