Pune District: शशांक व लता हगवणे यांच्यासह एकास पोलीस कोठडी

राजगुरुनगर : महाळुंगे (ताफ खेड) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जेसीबी वाहन खरेदीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शशांक राजेंद्र हगवणे (वय 27) आणि लता राजेंद्र राजेंद्र हगवणे (वय 50, दोघेही रा. भुकूम, ता. मुळशी) या मायलेकांसह या गुन्ह्यात नव्याने अटक करण्यात आलेल्या प्रणव तुकाराम साठे (वय 25, रा. कोथरूड) यांना 7 जूनपर्यंत खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान शशांक राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत अविनाश येळवंडे यांनी जेसीबीमध्ये (एच 12 एसयू 3165) फसवणूक झाल्याची शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात म्हाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलीस तपासानंतर शशांक हगवणे त्याची आई लता हगवणे यांच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या योगेश राजेंद्र रासकर (वय 25), वैभव मोहन पिंगळे (वय 27, दोघे रा. तळेगाव ढमढेरे), गणेश रमेश पोतले (वय 30, रा. मोहितेवाडी शेलपिंपळ्गाव) यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली. ते सर्व पोलीस कोठडीत आहेत तर या गुन्ह्यातील सहभागी प्रणव तुकाराम साठे याला महाळुंगे पोलिसांनी अटक केली. शशांक हगवणे त्याची आई लता हगवणे आणि प्रणव साठे या तिघांना म्हाळुंगे पोलिसांनी खेड न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस बी नाईकनवरे – गरड यांच्या पुढे हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता विशाल डोळस यांनी तपास करणेसाठी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायाधीश एस. बी. नाईकनवरे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शशांक हगवणे, आई लता हगवणे आणि या गुन्ह्यात सहभागी आरोपी प्रणव तुकाराम साठे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना पुन्हा उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.
आरोपीच्या वतीने युक्तीवाद
मुख्य आरोपी शशांक हगवणे यांचे वकील अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी संबंधित प्रॉपर्टी मुव्हेबल आहे, टीटी फॉर्म नाही, हा व्यवहार फक्त नोटरी झाला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला हे सिद्ध होत नाही. आरोपीवर यापूर्वी फक्त पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल आहे. 18 महिने जेसीबी वापरला ते भाडे द्यायचे नाही म्हणून हा बनाव केला आहे. बँकेचे जेसीबीवर कर्ज आहे. त्यामुळे जेसीबी ट्रान्स्फर कसा होणार. बँकेचा यामध्ये एक रुपयाचाही तोटा झाला नाही फिर्यादीने दिलेल्या पैशापेक्षा जेसीबीचे भाडे जास्त होत आहे असा युक्तिवाद करीत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. प्रणव तुकाराम साठे यांचे वतीने वकील अॅड. राहुल गुरव, अॅड. प्रवीण पडवळ, अॅड. प्रशांत राक्षे यांनी बाजू मांडली.





