आमदार बेनके : जाती-जातीत तेढ, खोटी माहिती पसरवल्याचा आरोप नारायणगाव – जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद सोनवणेयांनी माझ्याबद्दल खोटी माहिती देऊन समाज माध्यमांवर माझी बदनामी केली असल्याने शरद सोनवणे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. स्व. वल्लभ बेनके यांचा वारसा पुढे घेऊन जात असताना अतुल बेनके यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले असल्याने बेनके कुटुंबीयांची बदनामी सहन केली जाणार नाही असे सांगून शरद सोनवणे यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांनी सांगितले. शरद सोनवणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 9) नारायणगावच्या पूर्व वेशीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके मार्च 2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस याच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहून दाऊदशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अतुल बेनके यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात जाऊन सोनवणेंविरोधात शनिवारी (दि. 10) रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. अतुल बेनके म्हणाले की, माझ्या व्यावसायिक कामामुळे अनेक वेळा दुबईला जात असतो. ज्या लग्नासंदर्भात माझ्यावर आरोप करण्यात आले ते धादांत खोटे आहे. जुन्नरचे आमच्या कुटुंबाचे स्नेही स्व.बशीरभाई तिरंदाज यांची मुलगी रेश्मा इनामदार जुन्नर शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत. रेश्मा इनामदार यांचे सख्खे चुलतभाऊ अनिस इस्माईल तिरंदाज हे स्व. बशीर भाईंचे पुतणे आहेत. मूळचे जुन्नरचे रहिवासी व दुबई येथे उद्योजक असलेले अनिस तिरंदाज यांच्या कन्येचा विवाह होता. मला त्यांच्या कुटुंबाचे लग्नासाठी आमंत्रण आले होते. त्याच दरम्यान मी व माझे मेव्हणे संजय डुंबरे आणि त्यांच्या दोन मित्रांसह मार्च 2017 ला दुबईचा कामाचा प्लॅन तयार करून स्वखर्चाने दुबईला गेलो होतो. दुबईला लग्नाला गेल्यानंतर अनिस तिरंदाज यांच्या मुलीच्या लग्नासाठी जुन्नर शहरातील माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे अनिल मेहेर, उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांसह माजी नगराध्यक्ष स्व. किरण परदेशी सपत्नीक उपस्थित होते. अनिस इस्माईल तिरंदाज व दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इस्माईल कासकर दोन स्वतंत्र व्यक्ती असून त्यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे चुकीचा गौप्यस्फोट करून माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. दरम्यान, शरद सोनवणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतुल बेनके देशद्रोही असल्याचा मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित करून बेनके यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रकारचा तक्रारी अर्ज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रोहिदास केदारी यांनी नारायणगाव पोलिसांत दिला आहे. मुस्लीम समाजाची बदनामी अॅड. जमीर खान कागदी व मुस्लीम समाजाने शरद सोनवणेंनी केलेल्या आरोपावर तीव्र नापसंती व्यक्त केली. उद्योजक अनिस इब्राहिम तिरंदाज जुन्नरचे मुळ रहिवासी असून त्यांची मालमत्ता जुन्नर येथे आहे. अनिस तिरंदाज आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम कासकर यांचा कुठलाही संबंध नाही हे शरद सोनवणे यांना माहिती असूनही मुस्लीम समाजाला बदनाम केले. जुन्नरचा मुस्लीम समाज दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.