Pune District : शंभू महाराजांचे पुरंदर किल्ल्यावर स्मारक उभारणार

गराडे : जगाच्या इतिहासात एकही युद्ध न हारणारा व स्वतःच्या बुद्धीतेजाने वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ लिहिणारे तेजोमय प्रखर विद्वान पंडित राजा छत्रपती संभाजी महाराज पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा यासाठी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांना साजेसे स्मारक पुरंदर किल्ल्यावर उभारले जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदयसामंत यांनी केले.
पुरंदर किल्ल्यावर संभाजी सभागृहात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी महाराजांचा महती सांगणारा पाळणा गायला, यानंतर झालेल्या कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार संजय जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पर्यावरान शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर, पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे, डॉ. दिगंबर दुर्गाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री अॅड. शेलार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विक्रम राजपूत यांनी तर गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी आभार मानले.
यांचा पुरस्काराने गौरव
पुरंदर सोशल फाउंडेशन, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर, बायोसपीअर्स संस्था गौविद्या गोसंवर्धन केंद्र पुरंदर यांना कार्य गौरव पुरस्कार तर कैलास बगडाणे यांना पर्यायवरण सेवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू.
– अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री





