पुणे जिल्हा : आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

खाजगी संस्था बंद करण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबजनक घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे आळंदीतील एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
शनिवारी (दि. ४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा (वय २८, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार, जि. बीड) व त्याची बहीण ऋतुजा भीमराव दराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या आळंदीकरांनी आळंदीत असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था या खाजगी त्वरित बंद करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्यावरील एका संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आलेला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला.
दरम्यान त्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी महेश मिसाळ या आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.
यापूर्वीही घडल्या घटना
तीर्थक्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षणासाठी विविध वारकरी शिक्षण संस्था आहेत. राज्यभरातून विद्यार्थी येथे वारकरी शिक्षणासाठी येतात. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. यापूर्वीही अनेकदा लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने घडत असलेल्या या घटना चिंतेचा विषय बनला आहे.





