पुणे जिल्हा : ठेकेदाराच्या वादात सांडपाणी रस्त्यावर

पळसदेवमधील वॉर्ड क्रमांक चारमधील स्थिती
दुर्गंधीमुळे नागरिक बेजार
पळसदेव – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर भिगवण दरम्यान असलेले महत्त्वचे गाव म्हणून पळसदेव गावाची ओळख आहे. सध्या गेली अनेक दिवस या गावातील मुख्य बाजारपेठेस लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बंदिस्त गटारीचे काम अपूर्ण असल्यामुळे घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर येऊन साचून रहात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही या बाबत कुठलीही कारवाही होत नाही.
या गटारीचे काम मंजूर असताना देखील केवळ हे काम कुणी करायचे आहे या वादात हे काम गेले अनेक महिने प्रलंबित राहिले आहे. ठेकेदारीच्या वादात या भागातील नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. गावातील अनेक सदस्य ठेकेदार झाले आहेत. मी मंजूर करून आणलेली कामे मीच करणार या अट्टाहासापायी गावातील विकासकामे आडली आहेत.
पळसदेवमधील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बंदिस्त गटारीचे काम सरपंच इंद्रायणी मोरे यांच्या काळात मंजूर झाले आहे. गावाला नवीन सरपंच येऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्याप या बंदिस्त गटारीच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरी आहे. या भागातील पूर्वीची गटार लाइन काही भागात बुजवण्यात आली आहे.
गटार बुजवल्याने गटारीतील पाणी साचून थेट या भागातील रस्त्यावर येत आहे. या सांडपाण्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकंना या भागातून जा-ये करताना व येथील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदस्यांनी ठेका मिळण्यासाठी वाद न करता समस्यांची भूमिका घ्यावी व नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून त्यांची सुटका करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
हे काम मीच घेतले आहे. कामाचे ऍग्रीमेंट झाले नाही ते झाले की लगेच दोन दिवसात कामाला सुरुवात करणार आहे.
– कैलास भोसले, उपसरपंच





