– पत्रकारिता क्षेत्रातील हिरा हरपला वीसगाव खोरे – किवत, भोलावडे (ता.भोर) गावचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार, भोर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक, माजी अध्यक्ष, दैनिक प्रभातचे भोर तालुका प्रतिनिधी जुन्या पिढीतील व्यासंगी, ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून भोर, वेल्हा तालुक्यातील सामाजिक प्रश्न अभ्यासूपणे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला.साप्ताहिक निरावाणी वृत्तपत्राबरोबर सुरुवात करून गेली २५ वर्षे दैनिक प्रभातमध्ये भोर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांचे जीवन म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी प्रामाणिक नाळ जोडलेली एक आदर्श व प्रेरणादायी वाटचाल होती. भोर तालुका पत्रकार संघाचे सर्वसमावेशक नेतृत्व, आश्वासक चेहरा, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले लेखन, गाढा व्यासंग, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी, क्रीडा, कृषी, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सक्रिय योगदान देण्याचं काम त्यांनी केले, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, संशोधन आणि संवेदनशील साहित्यिक, असे भुजंगराव दाभाडे यांचे व्यक्तिमत्त्व होते. बातमीमागील बातमी शोधण्याचे काम करत शोधपत्रिकारितेवर त्यांचा भर असे. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे विश्वासू सहकारी, भोर तालुका काॅग्रेसचे सरचिटणीस, भोर तालुका पाणी परिषदचे सचिव, शाहू-फुले-आंबेडकर समितीचे समन्वयक म्हणून कार्यरत होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मुकनायक आदर्श पत्रकारिता पुरस्कार, श्री छत्रपती सेवेशी समस्त शिवभक्त पुरस्कार, सकल मराठा समाज पुरस्कार, साने गुरुजी जन्म शताब्दी पुरस्कार,रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्ड, अशा अनेक पुरस्कारांनी दाभाडे यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.आदर्श मुख्याध्यापिका भागिरथी दाभाडे यांचे ते पती होते.युवा उद्योजक हेमंत दाभाडे, वीरधवल दाभाडे यांचे ते वडील होत. अतिशय कठीण परिस्थितीत आणि प्रतिकूल स्थितीत भुजंगराव दाभाडे यांनी पत्रकारिता केली. सुरुवातीला साप्ताहिक आणि नंतर दैनिक प्रभातचे भोर तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रखरपणे सरकारदरबारी मांडले. पत्रकारितेचा प्रवास खडतर होता. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याबरोबर त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी काम केले. त्यानंतर माझ्याबरोबर त्यांनी काम केले आहे. भुजंगराव दाभाडे यांनी भोर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील वृत्तांकन करून सर्व घटकांना प्रवाहात आणण्याचे काम केले होते. नव्या पिढीतील पत्रकारांसमोर त्यांनी एक नवा आदर्श उभा केला होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. – संग्राम थोपटे, माजी आमदार, भोर. भोर तालुक्याच्या पत्रकारितेच्या दुनियेतील राजा माणूस हरपला आहे. भोर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भुजंगराव दाभाडे यांनी हा पत्रकार संघ एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. भोर तालुक्यातील प्रश्न, समस्या त्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर मांडून त्याचे निराकारण केले. सर्व सामान्य घटकांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले. भोर तालुक्यातील सामाजिक संस्था, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते एक मार्गदर्शकच होते. त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यातील पत्रकारितेत एक पोकळी निर्माण झाली आहे. निरपेक्ष, पारदर्शक, वास्तव स्थिती मांडणारे भुजंगराव दाभाडे यांना सद्गती लाभो, अशी श्रद्धांजली अर्पण करतो. – माजी प्राचार्य रमेश बुदगुडे. सहारा पॅकेजिंग इंडस्ट्रिज, अध्यक्ष, शिरवळ.