Pune District : महागाईच्या सावटातही मूर्तिकारांचा परंपरा जपण्याचा निर्धार

चिंबळी- गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील मरकळ आणि कुरूळी परिसरात कुंभारवाड्यांमध्ये भक्तांची लगबग सुरू झाली आहे. गणेश मंडळांच्या वतीने मूर्ती बुकिंगला सुरुवात झाली असून गावोगावी विक्रीसाठी स्टॉल उभे राहिले आहेत.
कुरुळी (ता. खेड) येथील माळशिकर व जगताप कुटुंबांनी यंदा दहा ते पंधरा हजार आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. घरगुती स्थापनेसाठी एक ते दोन फूट उंचीच्या मूर्ती पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पाच ते दहा हजार रुपयांच्या मूर्ती विक्रीसाठी आहेत. मात्र, यावर्षी कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे मूर्तींच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
महागाईने मूर्तीकारांचे गणित बिघडवले असले तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. हा व्यवसाय केवळ नफ्यासाठी नाही. यातून आनंद मिळतो, परंपरा टिकते, आपल्या सणांचा मान वाढतो, म्हणून आम्ही मूर्ती बनवतो, असे भावनिक शब्दांत कारागिरांनी सांगितले. वर्षभराची मेहनत, दिवसरात्र चालणारा घामाचा खेळ, आणि त्यातून साकारलेली बाप्पाची प्रतिमा – या सर्वातून मूर्तिकारांचा संघर्ष आणि श्रद्धा एकत्र दिसून येते.
गणेशोत्सव फक्त भक्तांचा नाही, तर मूर्तिकारांच्या हृदयातील भावनांचा आणि त्यांच्या उपजीविकेचा उत्सव आहे. महागाईच्या सावटातही ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा निर्धार वाखाणण्याजोगा आहे.





