Pune District : शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू; नांदगाव येथील घटना

पारगाव : दौंड तालुक्यातील नांदगाव येथील १३ वर्षीय मुलाला चार महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागली. उपचारासाठी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
शौर्य गणेश खराडे, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. माजी उपसरपंच गणेश खराडे यांचा तो मुलगा आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य याला (दि.१९) मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यादिवशी शौर्य यास पिसाळलेल्या कुत्र्याने किरकोळ ओरखडले होते. त्यानंतर याकडे शौर्य आणि त्याच्या कुटुंबीयाने दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन महिन्यांनी तो आजारी पडला.
त्यावेळी केडगाव येथील डॉ. भरत खळदकर यांना शौर्य याच्याबद्दल शंका आली. त्याची लक्षणे पाहता त्यांनी शौर्य यास पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. ससून हॉस्पिटलमध्ये शौर्याची रेबीज तपासणी करण्यात आली. या तपासणीत शौर्य हा रेबीज पॉझिटिव्ह आल्याचे समजले. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नाने त्यास नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवार (दि. २९) उपचारादरम्यान शौर्यची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. शौर्य याच्या मृत्यूने गावाने हळहळ व्यक्त केली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात कुत्रे पिसाळण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही कुत्र्याने चावा घेतल्यास हलगर्जीपणा न करता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. पाळीव प्राण्यांचे लसीकरण करून घेणे सुद्धा गरजेचे आहे.
– डॉ. भरत खळदकर, मयूरेश्वर हॉस्पिटल, केडगाव.




