Pune District : माऊलीच्या स्वागतासाठी सासवड सज्ज

सासवड – आषाढी वारीच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या दि २२ रोजी सायंकाळी सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी तळ सज्ज करण्यात आला असून, सर्व स्तरांवर जय्यत तयारी केली आहे.
शहरातील पालखी तळावर आकर्षक विद्युत रोषणाई,सीसीटीव्ही,आणि सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. पालखी आगमनानंतर विसाव्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी शेड, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शौचालये आदींची व्यवस्था केली आहे. कर्नाटक – बेळगाव येथील अंकलीच्या उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात २०० वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याच प्रमाणे माऊलींच्या अश्वाचा मान आहे.
यावर्षी दोन्हीही अश्वांचा मान त्यांचाकडे आहे. माऊलींसाठी रोजच्या पहाटेच्या नैवद्याचा मान देखील शितोळे सरकारांचा आहे. हा नैवद्य फक्त पुरणपोळीचाच असतो. तळावर उभारलेल्या अष्टकोनी आकाराच्या तंबूची लांबी २८ फूट, रुंदी १८ फूट तर उंची १४ फूट असून तो पूर्णतः पाणी व अग्नी विरोधक आहे. तंबूमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे. माऊलींचा हा तंबू उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाचे नट बोल्ट वापरले नसून हा तंबू केवळ अर्धा तासात उभारता तसेच काढता येतो.
स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, नगर परिषद आणि सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने नियोजन पार पडले आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात फुलांची सजावट, ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण, आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.





