स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये सुपर स्वच्छता लीग अंतर्गत सन्मान सासवड – स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या सुपर स्वच्छता लीग स्पर्धेत सासवड शहराने देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. सासवड शहराच्यावतीने राज्यमंत्री (नगरविकास) माधुरी मिसाळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता संकेत नंदवंशी आणि शहर समन्वयक रामचंद्र कारंडे यांनी पुरस्कार स्वीकारला. सासवड शहराने स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, जनजागृती, हरित उपाययोजना अशा अनेक बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत देशभरात आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे सासवडचा देशपातळीवर गौरव झाला असून, सासवड नगरपरिषदेकडून सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत. सासवड शहराने मिळवलेला हा राष्ट्रपती पुरस्कृत सन्मान म्हणजे शहरातील प्रत्येक घटकाने एकसंघपणे दिलेले योगदान आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. नगरपरिषदेने पुढील काळातही नागरिकांनी असाच सहभाग ठेवावा आणि सासवड शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर बनवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे.