Pune District : दारु,जुगाराच्या विरोधात सरपंचांचा आंदोलनाचा इशारा

मंचर : आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैद्य धंदे बंद करावे. अन्यथा रविवारी, दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनापासून सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व सर्व ग्रामस्थांकडून अन्नत्याग उपोषण करतील, असा इशारा सरपंच दीपक पोखरकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला.
पिंपळगाव खडकी येथे गावातील नागरिकांना, महिलाना, शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूधदे, जुगार, विमल,गुटका,विक्री इत्यादी अवैद्य धंदे गावात मोठ्या प्रमाणात चालू असून दारू पिऊन नागरिक गावामध्ये शिवीगाळ, अवार्घ्य भाषेमध्ये बोलून गावामध्ये धिंगाणा करतात.
सर्व अवैद्य धंदे सोमवार, दि. २० तारखेपूर्वी बंद करण्यात यावे. बंद न झाल्यास गावतील मुक्ताई मंदिर चौकात ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सरपंच दीपक पोखरकर यांनी मंचर उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, उत्पादन शुल्क विभाग नारायगाव ,मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना दिले आहे.





