पुणे जिल्हा : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने आगरच्या सरपंच नयना तांबे अपात्र

जुन्नर –जुन्नर तालुक्यातील आगर ग्रामपंचायत सरपंच नयना गणेश तांबे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास भूतलक्षी प्रभावाने अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत.
दत्तात्रय चौगुले (रा. आगर महादेवनगर) या नागरिकाने 7 जून रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य सरपंच नयना तांबे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 10 1 अ नुसार अपात्र करण्याकरिता लेखी अर्ज सादर केलेला होता. याबाबत सुनावणी होऊन अर्जदार तसेच जाब देणार यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता संधी देण्यात आली होती. आगर ग्रामपंचायतीची 2021 मध्ये निवडणूक झाली होती. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गात नयना तांबे निवडून येऊन त्या सरपंच झालेल्या होत्या.
शासन आदेशानुसार बारा महिन्याच्या मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. नयना तांबे यांनी ते प्रमाणपत्र सादर केले नाही.
शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेबाबत वेळोवेळी मुदतवाढ दिलेली असतानाही विहित मुदतीत 10 जुलै 2024 पूर्वी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांना अनर्ह घोषित करणे क्रमप्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे.या घटनेमुळे जात वैधता प्रमाणपत्र शासनाने दिलेल्या मुदतीत सादर न केल्याने सरपंच, सदस्य पद अपात्र ठरविण्यात आलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.





