Pune District : सणसर आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक स्थितीत

नव्या इमारतीसाठी ग्रामस्थांची मागणी
भवानीनगर –इंदापूर तालुक्यातील सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून इमारतीच्या छताचे तुकडे खाली कोसळू लागले आहेत. स्लॅबचे लोखंडी गज स्पष्टपणे दिसू लागले असून भिंतींना भेगा पडल्या आहेत. जमिनीवरील फरशी खचली आहे. त्यामुळे इमारत वापरण्यास पूर्णतः धोकादायक बनली असून येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी या इमारतीच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली असून रुग्णसेवेसाठी येणार्या नागरिकांचे जीव धोक्यात घालून उपचार सुरु ठेवणे हे अयोग्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने नवीन इमारत उभारावी, असे त्यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रातून सणसरसह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना सेवा दिली जाते. मात्र सध्या इमारतीची अवस्था इतकी खराब झाली आहे की, महिलांची स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया देखील येथे होऊ शकत नाही. या शस्त्रक्रिया सध्या काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे.
या केंद्रातील स्वच्छतागृहांचीही अवस्था अत्यंत दयनीय असून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली स्वच्छता आणि सुविधा पूर्णतः अभावात असल्याने या आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करणे अशक्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर सणसर ग्रामस्थांसह आरोग्य सेवा घेणार्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची तत्काळ पाहणी करून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची आणि काम लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात अथवा जीवितहानीची शक्यता नाकारता येणार नाही.
पालखी मुक्काम, पण आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष
सणसर हे इंदापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून दरवर्षी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा येथे मुक्काम होतो.
हजारो वारकरी येथे थांबत असतात, त्यामुळे या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिक जबाबदारी असते.
यंदा जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी सणसरला भेट दिली असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली नाही.
इमारतीची अवस्था अतिशय धोकादायक असून, या आरोग्य केंद्रात वारकर्यांना सेवा देणे अशक्य बनले आहे.
यामुळे पालखीच्या काळात आरोग्यसेवांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामस्थांचा ठाम आग्रह – प्राथमिक आरोग्य केंद्राची तातडीने पाहणी करून नवीन इमारत मंजूर करावी!





