पुणे जिल्हा : पारगावत एसी, कुलरची विक्रमी विक्री

होरपळलेल्या ग्राहकांचा कल
पारगाव – यंदा उन्हाचा पारा ४० पार जाऊन उन्हाळा असाह्य होऊ लागल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांचा घरात एसी व कुलर बसविण्याचा कल वाढला आहे. यापूर्वी कधी नाही ते यावर्षी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांत एअर कंडिशनर विक्रीचा विक्रम झाला आहे. दरम्यान, पारगाव येथील तीन दुकानांतून सरासरी चारशे एसी, कुलरची विक्री झाली आहे.
यावर्षी सूर्याने तापमान वाढीचा विक्रम केला असून लहान मुले, वृद्ध, विकलांग व आजारी लोकांना याचा फार त्रास झाला आहे. त्यामुळे यावर्षी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांमध्ये उत्पादनांची विक्रमी विक्री झाली आहे. हंगामामध्ये या उत्पादनांची सरांसरी पेक्षा तिप्पट प्रमाणात विक्री झाली आहे. अनेक दुकानदारांचा पूर्ण हंगामासाठी खरेदी केलेला माल एक महिन्यातच संपला आहे.
एकंदरीत शहरी भागात घरांच्या भिंतीवर दिसणाऱ्या एसीच्या फॅनचे बॉक्स आता ग्रामीण भागातील घरांवर दिसू लागले आहेत. नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादने बसवून उन्हाच्या झळांपासून संरक्षण करीत आहेत. परंतु हे सर्व करीत असताना अधिकच्या विजबिलापोटी खिशाला कात्री लागणार हे मात्र नक्की आहे.
पारगाव येथील राजवैभव फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक दुकानातून १०० एअर कंडिशनर (एसी ) व १०० हून अधिक कुलरची विक्री झाली असल्याचे दुकान मालक वैभव बोत्रे यांनी सांगितले. पारगाव येथील मोरया फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानातून ७८ एसी व २५० कुलरची विक्री झाली असल्याचे दुकान मालक अमोल जगदाळे यांनी सांगितले. शुभम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानातून १५ एसी व ४० हून अधिक कुलरची विक्री झाल्याचे दुकान मालक समीर बोत्रे यांनी सांगितले.





