Pune District : संत व बंधू भेट सोहळा उत्साहात

पंढरपूर तालुक्यात संतांच्या पालखी सोहळ्यांचे भक्तीमय स्वागत
पंढरपूर : भंडीशेगाव येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्यांनी गुरुवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पंढरपूर तालुका प्रशासन आणि भाविकांनी या सोहळ्यांचे उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात स्वागत केले. संत तुकाराम महाराजांचा सोहळा पिराची कुरोली येथे, तर माऊली आणि सोपानदेव यांचा सोहळा भंडीशेगाव येथे मुक्कामी विसावला.
पहाटे वेळापूर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते नित्य पूजा, अभिषेक आणि आरती झाली. सकाळी ७:३० वाजता सोहळा ठाकुरबुवाची समाधी येथे पोहोचला. चोपदारांनी रिंगण लावले, तर श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. भोपळे दिंडीचा ध्वज आणि अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने तीन फेऱ्या पूर्ण झाल्या. भाविकांनी अश्वांच्या टापाखालील माती भाळी लावत माऊलींचे दर्शन घेतले. रिंगणानंतर दिंड्यांमध्ये खेळ खेळले गेले. टाळ-मृदंगाच्या निनादात “माऊली-माऊली” चा जयघोष करत विणेकऱ्यांनी प्रदक्षिणा घातली.
रिंगणानंतर माऊलींची पालखी ठाकुरबुवा मंदिरात आणली गेली. ठाकुरबुवा हे माऊलींच्या सोहळ्यातील दिंडीकारी असून, त्यांनी येथे देह ठेवला होता. त्यांच्या समाधीवर माऊलींच्या पादुका ठेवून पूजा झाली. त्यानंतर सोहळा तोंडले बोंडलेकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी तोफेची सलामी, फुलांची उधळण करत सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी सोहळा नंदाच्या ओढ्यावर विसावला. याचवेळी संत तुकाराम महाराजांचा सोहळा बोरगाव-माळखांबी मार्गे धावा करत बोंडले येथे पोहोचला. दोन्ही सोहळ्यांनी येथे दुपारचे भोजन घेतले.
माळशिरस तालुका प्रशासनाने सोहळ्यांना भक्तीपूर्ण निरोप दिला, तर पंढरपूर प्रशासनाने उत्साहात स्वागत केले. सायंकाळी तुकाराम महाराजांचा सोहळा पिराची कुरोली येथे, तर माऊली आणि सोपानदेव यांचा सोहळा भंडीशेगाव येथे विसावला. या भक्तीमय वातावरणाने पंढरपूर परिसर विठ्ठलमय झाला आहे.
संत व बंधू भेट सोहळा
दुपारी एक वाजता संत सोपानदेव, दुपारी दिड वाजता संत तुकाराम महाराज व दुपारी दोन वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा संत, बंधूभेटीसाठी दसूरकडे मार्गस्थ झाला. सोपानदेव दोन वाजता, संत तुकाराम महाराज तीन वाजता तर संत ज्ञानेश्वर माऊली सायंकाळी पावणे चार वाजता दसूर पाटी येथे पोहोचले. सरपंच वंदना कागदे, उपसरपंच धनंजय सावंत आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. संत सोपानदेव संस्थानचे सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, ऍड. राजेंद्र उमप आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या जयघोषात भाविकांनी संतांचे दर्शन घेतले.





