पुणे जिल्हा : धामणीच्या खंडोबा मंदिरात सदानंदाचा येळकोट !

चंपाषष्ठीला पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट गर्दी
लोणी-धामणी – धामणी (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात सोमवारी (दि. १८) पहाटे चंपाषष्ठीच्या मूहर्तावर देवाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. चंपाषष्ठीला देवकार्याची पाच नामाची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती.
श्री कुलस्वामी खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिद्र वाघ आणि देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे, भगत, वाघे मंडळी यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर सप्तलिंगावर साधारण दोन फूट उंच व दीड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यानंतर या मुखवट्याला व देवाच्या पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा, म्हाळसाई, बाणाई व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या मूर्तीना वस्त्रालंकार चढविण्यात आले. पहाटे पूजा व महाआरतीनंतर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा उधळण्यात आला.
भगत मंडळीनी पंचपक्वानांचा आणि वांग्याचे भरीत, रोडग्याचा नैवेद्य देवाला अर्पण केला. सकाळी नऊ वाजता हभप नामदेव महाराज माशेरे आमदाबादकर (शिरूर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे, अविनाश बढेकर व सेवेकरी मंडळीनी केली.
महाप्रसादाचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी भंडारा उत्सव समितीच्या वतीने कवड्या गव्हाच्या भरड्याचा व सेद्रीय गुळाचा गावठी तुपाचा वापर करून तयार केलेल्या लापशी व वांग्याची भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसादाची व्यवस्था मच्छिद्रनाथ वाघ, किसनराव रोडे, आण्णा पाटील जाधव, डॉ. पाटीलबुवा जाधव, नामदेवराव जाधव, सुभाषराव काचोळे, सुभाष सोनवणे, प्रकाश जाधव, प्रकाशराव वरे, पंढरीनाथ खुडे यांनी केले.





