Pune District : माळेगावच्या निवडणुकीत सत्ताधारी- विरोधक भिडले

आरोप- प्रत्यारोपाचे धुराडे तापले
प्रमोद ठोंबरे
बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी अजित पवार गटाविरोधात गुरु- शिष्यांच्या तोफा धडाडत आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावात ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी गुरु शिष्याची जोडी पुन्हा एकदा मैदानात आरपारची लढाई लढत आहे.
माळेगाव कारखान्याची लढत आता अटीतटीच्या वळणावर पोहोचली आहे. सत्ताधारी अजित पवार गटाविरोधात तीन पॅनल मैदानात उतरले आहेत. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचे पॅनल, शरद पवार गटाचे पॅनल, शेतकरी संघटनेचे पॅनल, अशी चौरंगी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील संचालकांचा पाच वर्षांचा लेखाजोखा मांडला जात आहे. तसेच अजित पवार यांनी जुने- नवीन उमेदवारांचा मेळ घालत सर्वसमावेशक पॅनल दिले आहे.
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामांवर बोट ठेवत अजित पवार यांच्यासह संचालक मंडळाचे वाभाडे काढले जात आहेत. कारखान्याच्या कर्जबाजारीपणाचा हिशोब सभासदांसमोर मांडला जात आहे. अजित पवार यांनी मीच चेअरमन होणार, हे घोषित का करावे लागले, याचे खुलासे केले जात आहेत. संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळेच अजित पवारांवर ही वेळ आली असल्याचे सभासदांना सांगितले जात आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी मी चेअरमन होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या निवडणुकीत रंगत आली आहे. काही दिवसांत ही रंगत वाढत जाणार आहे. गुरु- शिष्यांची ही जोडी अजित पवार यांना कशा पद्धतीने शह देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अण्णा- काकांवर सभासदांचा विश्वास
सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आदर्श पद्धतीने कामकाज आम्ही केले. पारदर्शी व काटकसरीने कामकाज पद्धतीने माळेगावचे उदाहरण समोर ठेवले. त्यामुळे विरोधकांचा अपवाद वगळता सभासदांसह तर शेजारी कारखान्यांनाही माळेगाव कारखाना गुरु- शिष्यची जोडी म्हणजेच चंद्रराव तावरे व रंजन तावरे या नेतृत्वाकडे असावा, असे वाटत आहे. सभासदांना जास्तीचा भाव हवा आहे. सभासदांना विश्वास आहे. अण्णा- काका हेच जास्तीचा भाव देऊ शकतात. असे माजी चेअरमन रंजन तावरे यांनी स्पष्ट केले.
मी चेअरमन होणार ही दिशाभूल
उपमुख्यमंत्री अजित पवार हेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनलचा चेहरा बनले आहेत. संचालकाच्या चुकीच्या कारभारामुळे अजित पवार यांच्यावर ही वेळ आली आहे. सहकाराच्या पोटनियमानुसार ब वर्गातील विजयी उमेदवारास चेअरमन होता येत नाही. तरीदेखील मीच चेअरमन होणार, ही अजित पवार यांची घोषणा म्हणजे सभासदांची दिशाभूल आहे. माळेगावचा स्वाभिमानी शेतकरी सभासद त्यांच्यावर ही वेळ येऊ देणार नसल्याचे रंजन तावरे म्हणाले.
तालुक्याची काय प्रतिष्ठा ठेवली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन व्हायला निघालेत, ही त्यांच्या व तालुक्याच्या प्रतिष्ठेला अशोभनीय आहे. तालुक्याचे नेते प्रतिष्ठेसाठी माळेगावची लढाई लढत आहेत. तुमची प्रतिष्ठा तुमच्याकडे ठेवा. प्रतिष्ठेसाठी माळेगावच्या सभासदांची धूळधाण करू नका, अशी टीका ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी केली आहे.
खासगीचे षडयंत्र
सहकारी साखर कारखान्यांवर कर्जाचा बोजा वाढवून कारखाने डबघाईला आणले जात आहेत. त्यानंतर त्यांचे लिलाव करून हेच कारखाने ही नेतेमंडळी विकत घेत आहे. माळेगाव कारखान्याची अवस्था देखील कर्जबाजारी आहे. ३२ कोटीच्या डिसलरीवर १०० कोटींचे कर्ज घेतले आहे. इतर बाबींसाठी देखील शेकडो कोटींचे कर्ज उचलले आहे. माळेगावचा छत्रपती करण्याचा डाव असून सभासदांनी वेळीच सावध भूमिका घ्यावी, असे आवाहन रंजन तावरे यांनी केले आहे.





