Pune District : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षांच्या बंगल्यावर दरोडा

आळेफाटा – आळेफाटा येथील चौगुले वस्ती येथे शनिवार, दि.५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले व जीवन विमा प्रतिनिधी रमेश चौगुले यांच्या बंगल्यावर दहा जणांच्या टोळीने दरोडा टाकला. यात साडेतीन किलो चांदी,साडेचार तोळे सोने व दोन लाख रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला आहे.
शनिवारी रात्री ही घटना घडली असून अनंतराव चौगुले यांच्या घरात त्यांची आई व पत्नी होती. त्यांना ही घटना सकाळी उठल्यानंतर समजली. अनंतराव चौगुले हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर रमेश चौगुले यांच्या घरी संपूर्ण कुटुंब झोपले असताना ही घटना घडली आहे.
चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरात प्रवेश करून ऐवज चोरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून यासंदर्भात आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.





