Pune District : अतिवृष्टीमुळे मुठा घाटात रस्ता खचला

पिरंगुट – मुठा (ता. मुळशी) येथील घाटात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे घाटात रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन रस्ता खचला आहे. राज्य मार्ग ११५ असलेला हा रस्ता घोटावडे फाटा उरवडे येथून घाट मार्गे मुठा तसेच लवासा येथे जातो.
सध्या मुळशी तालुक्यात सर्वञ मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे मुठा घाट, मुठा गांव आणि मोरेवाडी परिसरात पाण्याचे लोट पाहायला मिळाले. चौकाचौकात तसेच अनेक घरात हे पाणी शिरले होते.तसेच अनेक ठिकाणी या पाऊसामुळे नुकसानही झाले आहे.
मुठा घाटातही काही ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात आले. परिणामी येणारे पाऊसाचे पाणि मार्ग बदलत असून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचे पाण्याचे लोट तयार होत आहेत. यामुळे दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी माती दगड पाण्याबरोबर वाहून आल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच यातून मार्गही काढणे अवघड झाले होते.
जास्त पाणी आलेल्या ठिकाणी घाटात रस्ता खचला आहे, याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी जाऊन खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेची कल्पना दिल्यानंतर याठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.





