Pune District : करंजे येथे भात लागवडीचा उपक्रम

-सायबेज आशा ट्रस्टने भोर, राजगड तालुक्यात काही गावे घेतली दत्तक
भाटघर – सायबेज आशा ट्रस्टने भोर व राजगड या दोन तालुक्यातील काही गावे दत्तक घेतली असून भोर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या करंजे या गावात भात लागवडीचा उपक्रम शनिवारी (दि.१२) राबविण्यात आला. या उपक्रमात ३० सायबेज स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. गावातील शेतकरी ज्ञानेश्वर कुडले यांच्या दीड एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती कामात मदत करणे आणि त्यांच्या कष्टात हातभार लावणे हा आहे. सायबेज आशा ट्रस्ट ही संस्था ग्रामीण भागातील विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. भात लागवड, वृक्ष लागवड, श्रमदान तसेच जमिनीची मशागत करणे यासारखे उपक्रम करीत असते. या संस्थेद्वारे गावांत प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ता, गटारे व पाण्याची व्यवस्था, आधुनिक शेती, शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटी इत्यादी अनेक उपक्रम राबविले जातात.
भात लागवडीच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मदत झाली तसेच स्वयंसेवकांनाही ग्रामीण जीवन आणि शेतीकामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. सायबेज आशा ट्रस्ट ही संस्था भोर आणि राजगड (वेल्हे) तालुक्यातील दत्तक घेतलेल्या गावांत शिक्षण, आरोग्य, शेती आणि सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. करंजे गावात रस्ते, अंतर्गत गटारे ही सार्वजनिक कामे सदर संस्थेद्वारे करण्यात आली आहे, शेतीविषयकही मदत करण्यात आली आहे.
” सायबेज आशा ट्रस्ट या संस्थेने गांडूळ खत निर्मितीसाठी मार्गदर्शन केल्याने आम्हाला गांडूळ खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना खते, बी – बियाणे, फळझाडांची रोपे देऊन फळझाडांना लागणारी खते तसेच फवारणीसाठी औषधे, शेती सिंचनासाठी पाईप मोफत दिले आहेत. गावात सार्वजनिक विकासकामेही संस्थेने केली आहेत.”
– ज्ञानेश्वर कुडले, शेतकरी, करंजे गाव (ता.भोर)





