पुणे जिल्हा : रेवती सुळे प्रचारात सक्रिय

बारामती शहरात मतदारांशी संवाद
बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे त्यांची पुतणे युगेंद्र पवार उभे ठाकले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. बारामती शहरातील विविध भागात गेले तीन दिवस त्यांनी रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला आहे. युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन त्या मतदारांना करत आहेत.
चुलते अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार ही राज्यातील हाय व्होल्टेज लढतीपैकी एक मानली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे आहे. लोकसभेतील स्ट्राईक रेट वाढल्यानंतर बारामती मतदारसंघात शरद पवार यांचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर युगेंद्र पवार यांना उमेदवारी देत अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे.
युगेंद्र पवार यांना मतदार संघातून प्रतिसाद मिळत आहे. जिरायत पट्टा व ग्रामीण भागात युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. बारामती शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शहरात देखील वातावरण दिसत आहे. गेले तीन दिवस रेवती सुळे या बारामती शहराच्या विविध भागात पायी रॅली काढून मतदारांना आवाहन करीत आहेत. त्यांना शहरातील युवकांची मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आहे.
शहराध्यक्ष संदीप गुजर, शहर युवकचे अध्यक्ष सत्यव्रत काळे, आरती शेंडगे यांनी शहरातील धुरा संभाळली आहे. त्यामुळे युवकांचा प्रतिसाद वाढत आहे. रेवती सुळे यांच्यासह शर्मिला पवार तसेच श्रीनिवास पवार देखील रॅलीमध्ये सहभागी होऊन मतदारांना आवाहन करीत आहेत.





