Pune District : पक्षकाराचे गहाळ रक्कम प्रामाणिकपणे परत

बारामती वकील संघटनेकडून बोळे यांचा सत्कार
बारामती – बारामती न्यायालयाच्या आवारात प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. लिपिक अरविंद बापूराव बोळे यांना सापडलेला पन्नास हजार रुपयांचा बंडल त्यांनी प्रामाणिकपणे परत केला. बारामती वकील संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
म्हसवड येथील वकील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी तरटे हे बारामती न्यायालयात कामानिमित्त आले होते. त्यांच्या पक्षकारांचे पन्नास हजार रुपयांचा बंडल न्यायालयाच्या आवारात हरवले. दुपारच्या सुट्टीत ते ५० हजार रुपये बोळे यांना सापडले. त्यांनी प्रामाणिकपणे ते बेंच क्लर्क यांच्याकडे जमा केले. कोणाचे पैसे असतील त्यांना परत करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली.
दरम्यानच्या काळात म्हसवड वकील संघटनेचे अध्यक्ष यांनी बारामती वकील संघटनेकडे लेखी अर्ज दिला. त्यामध्ये पक्षकाराचे पैसे हरवल्याचे नमूद केले होते. विचारपूस झाल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला. ज्या व्यक्तीचे पैसे हरवले होते. त्या व्यक्तीला ते पैसे परत करण्यात आले.
बारामतीच्या कोर्टात प्रामाणिकपणा दाखवत ५० हजार रुपये परत केलेल्या कोळी यांचा बारामती वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतोडे, ॲड. अमर काळे, ॲड. भार्गव पाटसकर, ॲड. श्याम कोकरे, ॲड. प्रीती शिंदे व म्हसवडचे वकील बंधू उपस्थित होते.





