मांडवगणमध्ये कृष्णा परदेशी यांचा प्रामाणिकपणा मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील जय मल्हार दूध संकलन संस्थेचे चेअरमन यांचे नजरचुकीने बँक ऑफ बडोदा शाखा मांडवगण फराटा शाखेत विमल शामराव परदेशी यांच्या बँक खात्यात ५६ हजार ८९० रुपये गेले होते. खातेदार या करोना काळात मृत झालेल्या आहेत. दूध संस्था अध्यक्ष संतोष फराटे यांना ही रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर गेल्याचे रात्री उशिरा लक्षात आले. परंतु फक्त खाते नंबर होता. नाव माहीत नव्हते. बँकेत चौकशी करायची तर बँकेला दोन दिवस सलग सुट्टी होती. सोमवारी सकाळी बँकेत गेल्यानंतर खातेदारांचे नाव समजले. त्यांचा मुलगा कृष्णा शामराव परदेशी यांना हे चुकून रुपये आईच्या खात्यावर गेल्याचे सांगितले. कृष्णा परदेशी यांनी बँकेत चौकशी केली तर खाते बंद पडलेले होते. बँकेची सर्व प्रक्रिया नियमानुसार त्यांनी पूर्ण करून संतोष फराटे यांना ती सर्व रक्कम सुपूर्त केली. कृष्णा परदेशी यांच्या या माणुसकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन संतोष फराटे व व्यापारी संघटना अध्यक्ष हरिमामा फराटे, ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कृष्णा परदेशी म्हणाले की, आपण व्यावसायिक आहोत. नेहमीच ग्राहकांचे दुकानात साहित्य विसरून जाते. मापासाठी दिलेल्या कपड्यामध्ये रुपये, मौल्यवान वस्तू सापडत असतात. ते सर्व प्रामाणिकपणे परत करीत असतो. हे सर्वच व्यावसायिक करीत असतात. त्यामुळे ही रक्कम स्वतःहुन ज्यांची होती. त्यांना परत केली. यावेळी मोहन फराटे, दिलीप फराटे, हरीमामा फराटे, कृष्णा परदेशी, उमेश जाधव, सोमनाथ राऊत, कालिदास तनपुरे, सतीश गदादे, सचिन गायकवाड, दादा लगड, प्रवीण शितोळे, सागर आहेर, शरद हेंद्र, दूध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.