Pune District : आमदार लोणीकरांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद

पिंपळवंडीत निवृत्ती वाघ यांचे चार दिवसांपासून उपोषण
पिंपळवंडी – पेरणी करायला तुझ्या बापाला सहा हजार रुपये देतो, असे आक्षेपार्ह विधान भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकर्यांना उद्देशून केले होते. त्याचा निषेध करत पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी निवृत्ती सखाराम वाघ यांनी मळगंगा मंदिराच्या प्रांगणात कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार (दि. 2) पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत योग्य निर्णय न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील शेतकरी संघटनेने दिला आहे.
आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, संगीता वाघ, जुन्नर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, शरद लेंडे, देवदत्त निकम, माऊली खंडागळे, सरपंच मेघा काकडे, नंदा वाघ, सुप्रिया लेंडे, माधुरी लेंडे, आकांक्षा वाघ, उज्ज्वल वाघ, शर्मिला वाघ, पुनम वाघ, अनिता वाघ, संध्या कणसे, संगीता वाघ, मनीषा वाघ, सुजाता वाघ, श्रीशांत वाघ, मीरा वाघ, रेश्मा वाघ, कल्पना कोकाटे, उद्योजक लक्ष्मण मंडलिक, शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, संजय भुजबळ, अजित वाघ, अजित वलझाडे, डॉ. दत्ता खोमणे, सचिन थोरवे, मनोज शिंदे, प्रमोद खांडगे, तानाजी तांबे, राजेंद्र ढोमसे, डॉ. गणपत डुंबरे, विजय वाघ, रोहन वाघ, माऊली वाघ, कल्पना कोकाटे आदी मान्यवरांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणास पाठिंबा दिला आहे.
बेताल वक्तव्य करणार्या भाजपाच्या बबनराव लोणीकर यांनी शेतकर्यांची माफी मागावी आणि नैतिकता असेल तर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. शेतकर्यांना दिले जात असलेले पैसे जनतेच्या तिजोरीतून दिले जात आहे. ते त्यांच्या स्वमालकीचे नाही हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. शेतकर्यांचा सहा हजारात खर्च भागतो का असा प्रतिप्रश्न निवृत्ती वाघ यांनी उपस्थित केला. शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार विधिमंडळात करीत असताना त्यांना निलंबित केले जाते, याचा अर्थ शेतकर्यांचा आवाज दाबण्याचे काम शासनाकडून केले जात आहे.
शेतकर्यांची बदनामी होऊ नये यासाठी शासनाने कायदा करणे गरजेचे आहे. शेतकर्यांप्रती आक्षेपार्ह वक्तव्य करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.
सचिन थोरवे, अध्यक्ष, शेतकरी संघटना
निवृत्ती वाघ यांचा उपोषणाचा 4 था दिवस आहे. बबनराव लोणीकर यांनी शेतकर्यांबद्दल वक्तव्य केले ते पदावरील व्यक्तीला शोभनीय नाही. शेतकर्यांचा अपमान आहे.
– मेघा काकडे, सरपंच, पिंपळवंडी
विधानसभा अध्यक्षांनी बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई करावी आणि पक्षाने दखल घ्यावी असे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्र दिले आहे.
– गोविंद शिंदे प्रांत अधिकारी
बबनराव लोणीकर यांनी शेतकर्यांबाबत आक्षेपार्ह व खेदजनक वक्तव्य केले, त्यामुळे शेतकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी पिंपळवंडी येथील निवृत्ती वाघ हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भावना जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके यांनी पत्राद्वारे शासनास कळवाव्यात असे आदेश देण्यात आले आहे. निवृत्ती वाघ व शेतकरी संघटनेचे आंदोलन त्वरित थांबविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
– शरद सोनवणे, आमदार
उपोषण स्थळी निवृत्ती वाघ यांची दिवसातून तीन वेळी आरोग्य तपासणी केली जात आहे. सध्या प्रकृती स्थिर असून रक्तदाब वाढला आहे.
डॉ. सत्यम जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र





