पुणे जिल्हा : आळंदीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवा

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिले आदेश
आळंदी – घाटकोपर (मुंबई) येथील होर्डिंग्ज दुर्घटनेच्या
पार्श्व भूमीवर राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पावसाळा विचारत घेता आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढण्याचे करण्याचे व याकामी येणारा खर्च होर्डिंग्ज उभारणारे तसेच ज्यांच्या खासगी जागेत होर्डिंग्ज असतील त्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करातून वसूल करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास दिले आहेत.या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने नोटिसा बजावून पुढील कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली.
आळंदी नगरपरिषद कार्यालया मार्फत परवानगी घेवून उभारण्यात आलेल्या होर्डिंग्ज धारकांना देखील नोटिसा बजावून 15 दिवसांच्या आत रचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल सादर करण्याच्या व असा अहवाल विहित मुदतीत सादर न करणार्या होर्डिंग्ज तत्काळ निष्कासित करण्याबाबत मुख्याधिकारी केंद्रे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास सूचना केल्या आहेत. आळंदी नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर येथील 3 व चाकण चौक येथील 1 अशा 4 होर्डिंग्ज देखील काढून घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी केल्या आहेत.
त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार
आळंदी नगरपरिषद अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करणार्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंतच्या काळात एखादी होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंग्जधारक तसेच ज्यांच्या खासगी जागेत अशी होर्डिंग्ज असेल ते जागा मालकावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिला आहे.





