Pune District :पालखी मार्गावरील झाडे- झुडपे हटवा

आमदार राहुल कुल यांची अधिकाऱ्यांना सूचना
यवत/ वरवंड – यवत आणि वरवंड येथील पालखी मार्गावरील अनावश्यक झाडे – झुडपे काढून टाकावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, जलसंपदा विभागाने व पाणीपुरवठा विभागाने यंत्रणा तैनात ठेवावी, अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी केल्या.
पंढरपूर आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा (दि.२३) यवत येथे व (दि.२४) रोजी वरवंड येथे मुक्कामी असून यानिमित्ताने पालखीतळ, यवत कालभैरवनाथ मंदिर व वरवंड येथे विठ्ठल मंदिर परिसरात तयारीची व कामाची पाहणी आमदार कुल यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
कुल म्हणाले की, पंचायत समिती व आरोग्य विभागाने फिरते शौचालय, अतिदक्षता विभागाचे वेड, रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी केंद्र, स्वच्छतागृह, पालखी तळाची स्वच्छता व आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, वनविभागाने वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे, पथदिव्यांची सोय करत आपत्कालीन कक्ष उभारावा, पोलिसांनी वारीच्या दरम्यान चोरीचे प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, पावसाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन वारकरी व भाविक भक्तांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार कुल यांनी केल्या आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे, मयूर सोनवणे, चेतन शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, वन परीक्षेत्र अधिकारी राहुल काळे, यवतचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, बाळासाहेब लाटकर, नाना महाराज दोरगे, इम्रान तांबोळी, गणेश शेळके, वरवंडचे माजी सरपंच गोरख दिवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर, बाजार समितीचे संचालक अशोक फरगडे, खरेदी- विक्री संघांचे संचालक सचिन सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मचारी चोखपणे काम करतील
कुल म्हणाले की, वारीच्या पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची तयारी, पाणी, वीज, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. दौंड तालुका वारकरी भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. प्रत्येक कर्मचारी हा आपले काम चोखपणे काम करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.





