Pune district: बिबट प्रवण भागातील शेतकऱ्यांना दिलासा

हिवरे पंचक्रोशीत शेतकऱ्यांना रात्री शेतीला पाणी देण्यास जाण्याची गरज नाही; आता मिळणार दिवसा वीज
ओझर – जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या हिवरे बुद्रुकसह पंचक्रोशीतील दहा गावांमध्ये शेतीपंपांना आता दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. तेजेवाडी येथे १२ एकर गायरानावर उभारलेल्या ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. ३) शुभारंभ झाला. यामुळे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची रात्री-अपरात्री शेतात जाण्यापासून सुटका झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. राज्यात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे असे प्रकल्प उभारले जात असून, त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांसाठी दिवसा उपलब्ध करून दिली जात आहे. जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघात असलेल्या तेजेवाडी गावात हा चार मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे तेजेवाडी, ओझर, हिवरे खुर्द, शिरोली खुर्द, शिरोली बुद्रुक, कुरण, ढोळवाडी आणि भोरवाडी अशा १० गावांना फायदा होणार आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते युवराज जरग, अनिल घोगरे व संजीव नेहते, कार्यकारी अभियंते राहुल गवारे, केशव काळुमाळी, धनंजय अहेर व प्रवीण पंचमुख, तसेच तेजेवाडीचे सरपंच संपत नायकोडी आणि उपसरपंच राजू विश्वासराव यांसह अधिकारी, कर्मचारी आणि मे. आवाडा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘‘तेजेवाडी हा मंचर विभागातील तिसरा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी पेठ (ता. आंबेगाव) व नेतवड (ता. जुन्नर) येथेही असे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांमुळे रात्री शेतात जाण्याचा धोका होता. परंतु, या सौर प्रकल्पांमुळे आता शेतीसाठी दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांची ही मोठी समस्या दूर होईल.’’
– राजेंद्र पवार, संचालक महावितरण





