पुणे जिल्हा : मुळशी धरणातून मुळा नदीत २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पौड : मुळशी तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुळशी धरण ९६ टक्के भरले असून शनिवारी ( दि. ३) मुळा नदीत सुरुवातीला सकाळी १८७७० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. दुपारी 2 वाजता २०१७७ क्यूसेक्स तर सायंकाळी चार वाजता यामध्ये वाढ करून २३२८१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुळशी तालुका व पिंपरी चिंचवड मधील नदीकाठच्या काही गावाना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धुवाधार पावसामुळे शुक्रवारी (दि. २) सायंकाळी मुळा नदीत १५ हजार २६५ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यात टप्याटप्याने वाढ करण्यात आली असल्याची माहिती टाटा धरण प्रकल्पाचे अधिकारी बसवराज मुन्नोल्ली यांनी दिली.
धरणाची एकूण क्षमता २१.५ टीएमसी इतकी आहे. २५ जुलैपासून धरण परिसरातील डोंगर दऱ्यात जोरदार पडत असून पावसाने मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रम केला आहे.एका दिवसात ६०० मिमीटर इतका पाऊस पडला. गेल्या आठवड्यात मुळशी धरणातून एक थेंबही पाणी न सोडता मुसळधार पाऊस झाल्याने मुळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते.
मात्र, पाऊस ओसरताच हे पाणी कमी झाले व नंतर काही कालावधीने टप्प्याटप्प्याने मुळशी धरणातून पाणी सोडले गेले.परंतु धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याकारणाने शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून मुळा नदीपात्रात १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
तत्पूर्वी तो ७ हजार ७५० ने करण्यात येत होता. सकाळी ११ वाजता धरण जलाशयाची पातळी ६०६.६० मीटर होती, तर सायंकाळी ४ नंतर विसर्ग १५ हजार २६५ क्युसेक इतका करण्यात आला होता. शनिवारी पावसाचा जोर कायम असल्याने सकाळी १८७७० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. तर सायंकाळी चार वाजता विसर्गात वाढ करून तब्बल २३२८१ क्यूसेक्स पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले.
त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुळा नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारीच नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी अधिकची सावधानता बाळगावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे.





