Pune District : सोमेश्वरनगरात पैलवानीच्या जुन्या आठवणींना उजाळा

तानाजी सोरटे यांचा पुढाकार : ७०-८० च्या दशकातील दिग्गज पैलवान एकत्र
विजय लकडे
सोमेश्वरनगर – ७० – ८० च्या दशकात पैलवान होणं हे केवळ शारीरिक कष्ट नव्हते, तर ती होती एक तपश्चर्या! त्या काळात अनेक आखाडे गाजवणारे आणि कुस्तीमधील झुंजार प्रवास घडवणारे पैलवान आता एकत्र आले. नवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी सोरटे यांच्या पुढाकारामुळेच सुवर्णयोग आला.
सोमेश्वरनगर येथे महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी संभाजी काळोखे, पै. प्रकाश मारुती कळवे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. संभाजी मारुती राक्षे, पै. नारायण बाबुराव मोठे, पै. दिलीप पिंजन, पै. अशोक काळभोर हे सारे लढवय्ये नवनाथ उद्योग समूहाच्या कार्यालयात एकत्र आले. यावेळी त्यांनी नवनाथ उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष सोरटे यांना सदिच्छा भेट दिली. जुन्या सवंगड्यांचा सन्मान करताना सोरटे यांनी सर्वांना मोठ्या आत्मीयतेने आदर सत्कार केला आणि एकत्र येत जुन्या पैलवानीच्या आठवणींना हृदयस्पर्शी उजाळा दिला.
भेटीत जुन्या पैलवानांच्या डोळ्यांत जुन्या लढतींची आठवण भरून आली. अनेकांनी गहिवरून आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे सर्व पैलवानांनी आज देखील कुस्तीशी नाळ जुळवलेली आहे. ते नवे पैलवान घडवत आहेत. कुस्तीतील बारकावे शिकवत आहेत. महाराष्ट्र केसरी बनवण्यासाठी नवोदितांना मार्गदर्शन करत आहेत.
स्वतःचे महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी तानाजी सोरटे यांनी त्यातून खचून न जाता मगरवाडी येथे कुस्ती केंद्र सुरू केलं आहे. केंद्रात सुमारे शंभर नवोदित पैलवान तयार होत आहेत. जुन्या मित्रांनी कुस्ती केंद्राला भेट देऊन सोरटे यांना शाबासकीची थाप दिली आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली. भेटीत जुन्या पैलवानीच्या आठवणींनी पुन्हा जिवंत होत एक वेगळाच ऊर्जा संचारली. एक काळ गाजवणारे हे पैलवान आजही महाराष्ट्राच्या मातीतून पुन्हा नवे मल्ल घडवण्यासाठी झपाटले आहेत.
महाराष्ट्र केसरी स्वप्न अजूनही सुरूच…
पैलवान तानाजी सोरटे यांचं ‘महाराष्ट्र केसरी’ बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, त्यासाठी खचून न जाता त्यांनी पुढची पिढी घडवण्याचा निश्चय केला. मगरवाडी येथे त्यांनी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे, जिथं सुमारे शंभर नवोदित पैलवान नियमित सराव करीत आहेत. हे केंद्र केवळ प्रशिक्षण देत नाही, तर जुन्या पैलवानांच्या अनुभवांचं सोनं नव्या पिढीला देत आहे.





