Pune District :बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर मजुरांची नोंदणी

इंदापूर : मागील काही वर्षांपासून असंघटीत क्षेत्रातील कामगारांना, लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा बर्याच प्रमाणात कामगार व त्यांच्या पाल्यांना लाभ देखील मिळत आहे; परंतु लाभासाठी अनेकजण बांधकाम कामगार झाल्याचे चित्र आहे. लाभ मिळत असल्याने जे बांधकाम कामगार नाहीत, असेही अर्ज करून योजनांचा लाभ घेत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
बोगस प्रमाणपत्र दाखल करून अनेकांना बांधकाम कामगार बनविले जात आहे. या प्रकारामुळे खरे कामगार योजनांपासून दूर राहत आहेत. बोगस कामगार मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. या प्रकाराची चौकशी करून, इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातील दलालांवर लगाम लावण्याची मागणी केली जात आहे. कामगार कल्याण महामंडळातर्फे देण्यात येणार्या योजनांच्या लाभासाठी, बांधकाम कामगार मजुरांना कामगार असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. तेव्हाच योजनेचा लाभ दिला जातो. यात आर्थिक लाभाच्या योजना असल्याने अनेक उच्चभ्रू परिवारातील महिला, पुरुष व तरुणांनी एकही दिवस कामावर गेले नसताना, दलालामार्फत अधिकचे पैसे देऊन बांधकाम मजुराचे बोगस प्रमाणपत्र मिळवत आहेत.
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम मजुरांची नोंदणी केली जात आहे. नोंदणीच्या आधारे अनेक आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घेऊन शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. परिणामी पात्र बांधकाम कामगार लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याने, चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकाराची गांभीर्याने चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
प्रमाणपत्र असणे आवश्यक
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी, आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये एखाद्या कंत्राटदारांकडे किंवा कामाच्या इतर ठिकाणी, वर्षभरात कमीत कमी 20 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र व ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे; मात्र सद्यः स्थितीत ग्रामपंचायतीच्या सचिवाकडून प्रमाणपत्र देणे बंद आहे. अशा स्थितीत एकही दिवस कामावर न गेलेल्या उच्चभ्रू परिवारातील लोकांनी आर्थिक लाभाच्या योजनेसाठी दलालामार्फत बनावट प्रमाणपत्र जोडून, बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली. अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जोडलेल्या कागदपत्रांची जिल्हास्तरावरून चौकशी केल्यास अनेक बोगस बांधकाम कामगार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एवढे बांधकाम कामगार आले कुठून?
कामगार कल्याण महामंडळातर्फे योजनांचा लाभ घेण्यासाठी, असंघटीत क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे. त्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागते; परंतु कंत्राटदाराकडे कामगार एकही दिवस बांधकामावर नसतानाही, अनेक कंत्राटदारांनी आर्थिक लोभापायी बांधकाम कामगाराच्या फॉर्मवर स्वाक्षरी दिलेल्या आहेत. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या फॉर्मची तपासणी करून, स्वाक्षरी असलेल्या कंत्राटदाराच्या कामावरील मस्टरची चौकशी केल्यास अनेक कंत्राटदारसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.




