पुणे जिल्हा : निमसाखरमध्ये आढळला ’रसल कुकरी’ दुर्मिळ साप

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे सर्पमित्राच्याच घरी एक ’रसल कुकरी’ हा दुर्मिळ साप आढळला. सर्पमित्र अमित अडसूळ यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले असले, तरी अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याने निमसाखर परिसरात तो कुतुहलाचा विषय झाला आहे.
सर्पमित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून अमित अडसूळ गेली अनेक वर्षांपासून काम करत आहेत. नुकतेच सकाळवेळी नित्तनियमाप्रमाणे आडसुळ हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. काही वेळातच घाबरलेल्या अवस्थेत अडसूळ यांच्या लहान मुलीचा घरामध्ये साप आल्याचे लगेच वडिलांना फोन करून सांगीतले.
या सापाचे निरीक्षण केले असता ’रसेल कुकरी’ हा साप दुर्मिळ असून निमसाखर परिसरामध्ये प्रथमच आढळला आहे. हा साप बिनविषारी गटातील असून याची सरासरी लांबी 1.6 इंच आहे. या सापाच्या मानेवर उलटा ’व्ही’ अक्षराची खूण असून सापाचे पोट पांढरट किंवा फिकट पिवळसर आहे. रसेल कुकरीचे शरीर सडपातळ व शेपूट आखूड असते.
साधारण या सर्वांचा एप्रिल महिन्यादरम्यान या सापांचा प्रजनन काळ असून एक मादी 5 ते 9 अंडी घालते. लहान-लहान सरपटणारे प्राणी, किटक व त्यांची अंडी या सापाचे खाद्य असते. हा साप अत्यंत शांत स्वभावाचा समजला जातो; मात्र जर कधी हल्ला करायचा असेल तर, तो शरीर फुगवून हल्ला करतो.





