Pune District : आळंदीत युवतीवर बलात्कार

पाच जणांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
आळंदी – शहरातील केळगाव रस्त्यावरील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध अपहरण व बलात्कार केल्याची गंभीर तक्रार शेवगाव (जि. अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या महिलेने तिला शेतात चल असे म्हणत बाहेर नेले. वाटेत एका काळ्या रंगाच्या गाडीत (एमएच 43 सीसी 7812) अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला बसवले. आरडाओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले.
तेथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर बलात्कारकेला. या घटनेनंतर पीडितेने 112 नंबरवरून मदत मागितली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी ठाण्यात आणण्यात आले. घाबरल्यामुळे पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती. परंतु, घरच्यांना सर्व हकिकत सांगितल्यावर 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा चालक, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, जबरदस्ती बलात्कार, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





