Pune District : गारगोटी हायस्कूलमध्ये राख्या निर्मिती कार्यशाळा संपन्न : विद्यार्थ्यांनी बनवल्या पाच हजार राख्या

गारगोटी : गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात राख्या निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाच हजार राख्या तयार केल्या. या राख्या भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
प्रारंभी या उपक्रमाच्या प्रमुख श्रीमती आर. आर. बहादुरे यांनी राखी बनविणे या उपक्रमाचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे सांगून यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळणारा वाव, स्वनिर्मितीचा आनंद, चिरकाल स्मरणात राहील अशी आठवण, आर्थिक फायदा, नवीन व्यवसाय संधी याबद्दल माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेल्या साहित्याच्या आधारे वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर अशा राख्या तयार केल्या. राख्या तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.
या उपक्रमासाठी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन तर श्री.धीरज मेंगाणे व उत्कर्ष गव्हाणकर यांचे सहकार्य लाभले.





