प्रारूप प्रभाग रचना जाहीर ः 31 ऑगस्टपर्यंत हरकती मागविल्या राजगुरुनगर –राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम अखेर वाजले असून नगरपरिषद प्रशासनाकडून सोमवारी (दि. 18) दहा प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली. अशी माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून नगर परिषदेच्या दहा प्रभागांतून एकूण 21 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यातील समतानगर-माळीमळा परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मधून 3 तर उर्वरित प्रत्येक प्रभागातून प्रत्येकी 2 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. सन 2014-15 मध्ये राजगुरुनगरला नगरपरिषद अस्तित्वात आली व पहिली निवडणूक झाली. त्यानंतरचा कार्यकाळ संपून सहा वर्षे लोटली असली तरी नगरपरिषद निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या कालावधीत प्रशासकीय अधिकारी नेमले गेले; मात्र ठोस निर्णय व धोरणात्मक कामे होऊ शकली नाहीत. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. राजगुरुनगर शहरात मोठी योजना होऊनही आजही शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. रस्ते, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधाही अपुर्या राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. नगरपरिषदेच्या प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वेळा आंदोलने झाली. त्यामुळे शहरवासीयांना आगामी निवडणुकांची आतुरता लागली आहे. ही नाराजी मतदानातून व्यक्त होणार असे चित्र दिसत आहे. प्रभाग रचनेनुसार मतदारसंख्या प्रभाग 1 (2923) : थिगळस्थळ, पांडुरंगनगर प्रभाग 2 (2562) : पडळावाडी प्रभाग 3 (2790) : चव्हाण मळा, जुना मोटार स्टँड प्रभाग 4 (2607) : स्वामी समर्थ कॉलनी, टेल्को कॉलनी नं. 1 प्रभाग 5 (2502) : टेल्को कॉलनी नं. 2 व 3 प्रभाग 6 (2467) : समृद्धीनगर, वाळुंज स्थळ प्रभाग 7 (4418) : समतानगर, माळीमळा प्रभाग 8 (3077) : राजगुरुवाडा, ब्राह्मण आळी प्रभाग 9 (2537) : बाजारपेठ, आझाद चौक प्रभाग 10 (2700) : गढई मैदान परिसर नगराध्यक्ष पद लोकनियुक्त असणार की निवडून आलेल्या नगरसेवकांमधून निवडला जाणार, याबाबत निवडणूक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आरक्षण सोडत आणि नगराध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगावर अवलंबून आहे -अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद