Pune District : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आळंदीत वारकर्यांना रेनकोट वाटप

तीन लाख रेनकोट वाटणार
आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांना गेली दोन दिवसांपासून रेनकोट वाटप सुरू आहे. माऊलींच्या सोहळ्यातील दिंड्यांसाठी तीन लाख रेनकोट वाटपासाठी आले आहे. वारकर्यांसाठीचे हे रेनकोट दिंडीप्रमुखांकडे दिले जात आहेत.
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या दिवसापर्यंत (दि. 19) आळंदीत वारकर्यांसाठी रेनकोटचे वाटप केले जाणार असून उर्वरित शिल्लक रेनकोटचे वाटप पालखी मार्गावर सासवड, जेजुरी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वारकर्यांसाठी रेनकोट मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही दिले आहेत. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. वारकर्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने रेनकोटचे वाटप केले जात आहे. सोहळ्यात चालणार्या दिंड्यांच्या प्रमुखांकडे आणि वीणा प्रमुखांकडे रेनकोट दिले जात आहेत.
दिंडीतील वारकर्यांची जेवढी संख्या असेल तेवढे रेनकोट दिले जात आहेत. यासाठी दिंडी चालकांनी विहित नमुन्यामध्ये दोन अर्जांवर दिंडीचे पत्रक, दिंडीप्रमुखांची सहीकरून भाजपच्या आळंदीतील कार्यकर्त्यांकडे जमा करायचे आहे. वीणेकर्यांनी अर्ज आणले तरी रेनकोट दिले जाणार आहेत. या रेनकोट वाटप कार्यक्रमात भाजपा आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, गणेश गरुड, ज्ञानेश्वर बनसोडे, शंकरराव येळवंडे, शामराव गिलबिले, संकेत वाघमारे, शिरीष कारेकर व इतर पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
रेनकोटसाठी भरावा लागणार फॉर्म
रेनकोटसाठी दिंडीप्रमुखांना दिंडीचे नाव, दिंडी क्रमांक, मालकाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक, पत्ता, रेनकोट घेणार्याचे स्वतंत्र नाव, संख्या फॉर्ममध्ये लिहावी लागणार आहे. याचबरोबर दिंडीप्रमुखांचे स्वाक्षरी असलेले पत्र आणि दिंडीत चालणार्या भाविकांचे नाव, संपर्क क्रमांकाची यादीही जोडावी लागणार आहे. रेनकोटसाठी वारकर्यांना दोन फॉर्म भरून द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.
आळंदी ः येथे वारकर्यांना रेनकोट वाटप सुरू आहे.





