Pune District : रेल्वेचा मासिक पास 440 रुपये

बारामती : एसटीच्या भाववाढीनंतर बारामती पुणे हिरकणी या गाडीचे तिकीट रुपये 238 आणि शिवशाहीचे तिकीट रुपये 264 इतके आहे. पुण्याला जाऊन यायचे असेल तर रुपये 476 हिरकणीला आणि शिवशाहीसाठी 528 इतके रुपये मोजावेच लागतात, तर दुसरीकडे रेल्वेचा मासिक पास अवघ्या 440 रुपयात मिळतो, याचाच अर्थ महिनाभर रेल्वेने प्रवास केल्यास जाऊन येऊन अवघे 15 रुपयांतच प्रवास होऊ शकतो, तसेही रेल्वेचे बारामती आणि पुणे रेल्वेचे तिकीट 30 रुपये आहे, ही तुलना सर्वसामान्य माणसांसाठी महत्त्वाचीच आहे.
सध्या बारामतीहून पुण्याला सकाळी आणि संद्याकाळी रेल्वेची सेवा कार्यरत आहे. मात्र या रेल्वे ऐवजी मुंबईतील लोकलच्या धरतीवर वेगवान गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरीत आहे, सध्या रेल्वेच्या प्रवासाला जवळपास सव्वा तीन तासांपेक्षा अधिकचा काळ लागत आहे, हा वेळ कमी करून तो दोन तासापर्यंत आणल्यास पुणे-बारामती-पुणे ही रेल्वे सेवा अधिक लोकप्रिय होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
बारामती पुणे ही रेल्वे सेवा पुढे वाढवून पुणे – लोणावळा ते कर्जत पर्यंत कायम केली तर रेल्वेला अधिक उत्तम प्रतिसाद मिळेल, गेल्या काही दिवसात बारामती-पुणे-बारामती एसटी बसचा प्रवास हा अती महागडा झालेला आहे. बारामतीतील नागरीक लोकल रेल्वेची मागणी का करीत आहेत, हे गणित वरील आकडेवारीतच स्पष्टपणे दिसत आहे.बारामतीहून पुण्याला दैनंदिन कामकाजासाठी जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, अनेकांना एसटी बस पेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुखकारक वाटतो, या पार्श्वभूमीवर बारामती दौंड पुणे अशी वेगवान रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
बारामती मतदारसंघासाठी सध्या तीन खासदार आहेत, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे व्यापारी वर्गाने ही मागणी मांडून पुणे बारामती अशी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू,
– जवाहार शहा वाघोलीकर, सदस्य, स्थानिक रेल्वे सल्लागार समिती अशी
बारामती पुणे अशी लोकल सेवा सुरू केल्यास व्यापारी वर्गाला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, प्रवास खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होण्याबरोबरच खरेदी केलेला माल ही रेल्वेतून सोबत आणणे सोयीस्कर होणार आहे, वेळ कमी लागला तर रेल्वेसाठी व्यापारी सुद्धा प्राधान्य देतील, मुंबईला जोडणार्या गाड्यांनी जोडणी केल्यास याचा अधिक लाभ प्रवासी नागरिकांना होईल.
– सुशील सोमानी, अध्यक्ष, व्यापारी महासंघ
बारामती पुणे वेगवान लोकल सेवा ही सर्वांसाठी फायदेशीर ठरणारी आहे, सकाळी व संध्याकाळी रेल्वे गाड्यांच्या वेळा व्यवस्थित असतील तर लोक रेल्वेच्या प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतील, या माध्यमातून स्वतःची चार चाकी वाहने वापरण्याचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल.
– संभाजी किर्वे, अध्यक्ष, बारामती मर्चंड असोसिएशन





