४ नूतन अधीक्षक अभियंता रूजू : महावितरणचा ताण कमी होणार बारामतीला दीपक लहामगे तर पायाभूत आराखडा विभागात चंद्रशेखर पाटील झाले रुजू बारामती – महावितरण प्रशासनातर्फे नुकत्याच झालेल्या बदली व पदोन्नती प्रक्रियेतून बारामती परिमंडलास ४ नूतन अधीक्षक अभियंता मिळाले असून परिमंडलाचा अधीक्षक अभियंता पदाचा कोरम पूर्ण झाला आहे. चारही अधीक्षक अभियंत्यांनी सोमवारी आपापल्या पदाचा पदभार स्वीकारुन कामाला सुरुवात केली आहे. बारामती परिमंडल कार्यालयात पायाभूत आराखडा विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक अभियंता हे पद रिक्त होते. या पदावर बारामती मंडल कार्यालयातील चंद्रशेखर पाटील यांची बदली झाली. त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला तर बारामती मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता पदी अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांची पदोन्नती झाली. त्यांनीही पाटील यांचेकडून बारामती अधीक्षक अभियंता पदाचा कारभार स्वीकारला. सोलापूर मंडल अधीक्षक अभियंतापदी भांडुप शहर परिमंडलात कार्यकारी अभियंतापदी असलेले सुनील माने यांची पदोन्नतीवर सोलापूर अधीक्षक अभियंतापदी वर्णी लागली. माने यांनी (दि.१) सकाळी पदभार स्वीकारला व कामाला सुरुवात केली. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने माने यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. कवठे महंकाळ (जि. सांगली) विभागात कार्यकारी अभियंतापदी असलेले बाळासाहेब हळनोर यांची सातारा अधीक्षक अभियंता पदावर बढती झाली. त्यांनी सोमवारी (दि.१) सातारा मंडल कार्यालयाचा पदभार स्वीकारुन कामाला सुरुवात केली आहे. बारामती परिमंडलात मंगळवारी (दि.२) मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलाच्या आढावा बैठकीत चारही अधीक्षक अभियंत्यांचे स्वागत केले.