पुणे जिल्हा : ग्रामीण भागातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

नव्या कायद्यामुळे वाहन चालक संपावर गेल्याचा परिणाम
मंचर : केंद्र सरकारने वाहनचालकांविरोधात केलेल्या नव्या कायद्यामुळे देशभरात वाहन चालक संपावर गेले असून, या संपात पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करणारे ट्रकचालकही सहभागी होणार असल्याने पुढील काही दिवस पेट्रोल पंप बंद राहू शकतात किंवा पेट्रोल पंपांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा पडू शकतो. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा दिसत असून, वाहनचालक आपल्या गाडीत इंधन भरण्यासाठी धडपड करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.
केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे.
त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यांत टँकर व ट्रक एकाच जागी लावले होते. या घटनेचे पडसाद पेट्रोलपंप चालकांवर होत आहेत. त्यातच, राज्यभरात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार असे संदेश सोशल मीडियावर फिरत असून, या पार्श्वभूमीवर वाहन चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी करीत आहेत.
चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरून टँकर बाहेर पडले नाहीत. काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे, पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची संदेश सर्वत्र पसरले होते. आंबेगाव तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केली आहे.
इंधन पुरवठा सुरळीत राहणार
दरम्यान पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशनने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकात म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं पॅनिक होऊ नका. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघटना बांधिल आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे स्पष्ट केले आहे.





