Pune District : शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

माजी सदस्यावर गुन्हा : सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी
निमोणे – शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका ४२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याला सात जणांनी जमिनीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी एका माजी पंचायत समिती सदस्यावर गुन्हा दाखल झाला होता. ही घटना घडल्यानंतर शिरुर पोलिसांनी सातपैकी तीन आरोपीना अटक केली होती. त्यांना सात दिवस पोलीस कोठडी दिली होती. (दि.३०) जून रोजी त्यांना जामीन मंजूर झाला. परंतु मुख्य आरोपी असलेला माजी सदस्य मात्र मोकाट फिरत होता. सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
माजी सदस्यावर गंभीर गुन्हा दाखल असतानाही तो सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत होता. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजरोसपणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असताना शिरुर पोलिसांवर राजकीय दबाव होता काय, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यात अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्याची सूर आळवला आहे.
याबाबत रमेश दशरथ वागदरे (वय ४२, सध्या रा. पडाळवाडी, ता. खेड, मूळ रा. कवठे येमाई, ता. शिरुर) यांना जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी सुभाष रामचंद्र पोकळे, किसन हिलाल, विकास देवकर, सोनू कैलास कोळपे, मुकुंद सुरेश घोडे, उत्तम नथू जाधव, संपत सुखदेव पोकळे या सात जणांवर शिरुर पोलिसांत (दि.१७) जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. मारहाणीत रमेश वागदरे डावा हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर राजगुरुनगर येथील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुढील तपास शिरुर पोलीस करीत आहेत.
शिरुर पोलिसांची प्रतिमा सुधारणार का?
करडे येथील एका माजी सैनिकाची आर्थिक फसवणूक झालेली असताना शिरुर पोलीस स्टेशनचा एका अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आरोपीला मदत केल्याच्या कारणावरुन तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत त्यांची मुख्यालयात बदली केली होती. सामाजिक कार्यकर्त्याला गंभीर मारहाण करुन मुख्य आरोपी मोकाट फिरत असेल तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याची प्रतीक्षा तालुक्याला लागून राहिली आहे.
कवठे येमाई मारहाण प्रकरणातील तीन आरोपीना शिरुर न्यायालयाने एकूण सात दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यांचा ३० जून रोजी जामीन झाला असून उर्वरित चार आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत.
– संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस स्टेशन.





